औरंगाबाद :  पानमळ्यांसाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादेतील सोयगाव तालुका सध्या करोनामुळे अडचणीत आला आहे. दिवाळीपासून उन्हाळ्याच्या हंगामासाठी राखून ठेवलेली पाने लॉकडाऊनमुळे वेलीवर तशीच आहेत. सध्या विवाह समारंभ रद्द झाले, पानटपऱ्याही बंद असल्याने शेतकऱ्यांनी पानांची तोडच केलेली नाही. पाने वेलीवरच लाल पडू लागली असून, यामुळे लाखोंचे नुकसान होणार आहे.


औरंगाबादचं सोयगाव हे महाराष्ट्र पानमळा साठी प्रसिद्ध आहे. सोयगाव मध्ये 50 हेक्‍टरवर पानमळे आहेत. अनेक शेतकऱ्यांची उपजीविका पानगळ यावर अवलंबून आहे. त्यामुळे पानांच्या रोपांना इथले शेतकरी आपल्या मुला-बाळाप्रमाणे सांभाळ करतात. ऐन हंगामात पानांनी पानमळा बहरलाय खरा पण कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने पान खरेदी करायला कोणी तयार नाही. त्यामुळे त्याच्या मेहनतीवर पाणी फेरल गेलय.


सोयगावचे शेतकरी विनोद मिसाळ यांनी आपल्या अर्धा एकर पानमाळ्यावर आजपर्यंत जवळपास 9 लाख खर्च केले आहेत. ऐन हंगामात पान तोडणी न झाल्यामुळे आजवर त्यांना एक रुपयेही मिळाला नाही. ही व्यथा एकट्या विनोद मिसाळ यांचीच नाही तर राज्यरील प्रत्येक पान शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आहे.


पान मळ्यांसाठी मेहनत आणि खर्च कसा होतो? 
पानमळा लागवड करण्याआधी दोन महिने अगोदर शेतात वाफे काढून त्यात शेवगा पिकाची लागवड केली जाते. त्यानंतर त्यामध्ये दीड ते दोन फुटांच्या अंतराने पानाच्या वेलीची लागवड केली जाते. एकरात सरासरी सात हजार वेलीची लागवड केली जाते. यावेळी सरासरी 10 ते 12 रुपये प्रति वेल याप्रमाणे खर्च होतो. सरासरी 70 ते 72 हजार रुपये वेलीचा खर्च होतो. त्यानंतर प्रथम 3 महिन्यांनी बांधणी करावी लागते. त्यासाठी 9 ते 10 हजार रुपये खर्च येतो. यामध्ये वर्षाला 9 ते 10 बांधणी होतात. यामध्ये 90 हजार ते 1 लाख रुपयांप्रमाणे खर्च येतो.पानमळ्याला वर्षाकाठी 6 ट्रेलर लेंढी खत टाकावे लागते. वर्षाला दीड लाख खतासाठी खर्च करावे लागतात. पान खुडणीसाठी साठी लागणार मजुरांचा खर्च वेगळाच .


यापेक्षा खुडणीला सर्वात जास्त खर्च होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात लॉकडाऊनमुळे पाने पानमळ्यातच बंद आहेत. खाण्याची पाने आयुर्वेदिक तत्त्वाची असली, तरी जीवनावश्यक नसल्याने त्यांच्या विक्रीसाठी कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. 


उन्हाळी हंगामासाठी राखून ठेवलेली पाने आता वयोमान संपत चालल्याने लाल पडू लागली आहेत. ती अजूनही तशीच राहिल्यास वेल जगविण्यासाठी केलेली शेतकऱ्यांची सारी मेहनत वाया जाणार आहे. या पानमळ्याला पिक विमा लागू होत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. हे लॉकडाऊन असंच राहील तर महाराष्ट्रातले पानमळे नामशेष होतील यात शंका नाही. कोरोनाच्या भयावहतेचं हे आणखी एक उदाहरण.


दुष्काळ पडला पानमळ्यावर संकट, वादळ वारा आला तरी पानमळा वर संकट. ही सगळी संकटं पार करत शेतकरी पानमळा फुलवतात. मात्र यावर्षी कोरोना नावाचं नवं संकट पानमळा शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. खरं तर या पानांची तोडणी झाली असती तर शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरले गेले असते. मात्र कोरोनामुळे पान तोडली गेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा  आयुष्य बेरंगी झालेला आहे. ही पानं येत्या पंधरा दिवसात तोडली नाहीत तर याचा देठ ही हिरवा राहणार नाही आणि शेतकऱ्यांचं लाखोचे नुकसान होईल.


महत्वाच्या बातम्या :