नवी दिल्ली : लसीचा एक डोसही वाया घालवू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एक डोस वाया जाणं म्हणजे एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखं आहे, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी आज दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा केली. यात महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आपल्या जिल्ह्यात कोविड संसर्ग रोखण्यासाठी कोणती वैशिष्ट्यपूर्ण पाऊले उचलली याची माहिती दिली.
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी कोणत्या सूचना केल्या?
कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
- कोरोनाव्हायरस अदृश्य आहे, रुपं बदलत असतो; त्यामुळे आपला दृष्टीकोन सातत्याने गतिशील आणि सुधारित असायला हवा.
- कोरोनाव्हायरसच्या म्युटेशनमुळे तरुण, लहान मुलांबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण त्यासाठी तयार असणं आवश्यक आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोविड संसर्गाची माहिती आणि त्यांच्या संबंधित जिल्ह्यातील तरुण तसंच मुलांमधील गांभीर्य याविषयी माहिती गोळा करण्यास सांगितलं आहे.
- लसीच्या अपव्ययाबाबत मोदींनी इशाराच दिला आहे. लसीचा एक डोसही वाया जाऊ नये असं मोदींनी म्हटलं. एक डोस वाया जाणं एखाद्याला आजारापासून संरक्षण नाकारल्यासारखं आहे.
केवळ नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोदींशी संवाद
महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. परंतु राज्यातून केवळ अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मात्र मोदींनी बातचीत केली नाही. यावेळी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील उपाययोजनांबाबत, आदर्शगाव हिवरेबाजार कसे कोरोना मुक्त झाले याची माहिती मोदींना दिली. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून काल सुद्धा 3700 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या 20 हजार रुग्णांवर उपचार सुरु असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. कदाचित या कारणांमुळे मोदींनी केवळ अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचं म्हटलं जात आहे.