Nathsashti Sohala: तब्बल दोन वर्षानंतर पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळ्याचा उत्साह, भानुदास एकनाथ नामाच्या गजरात वारकरी तल्लीन
कोरोनाच्या संकटामुळं तब्बल दोन वर्ष रद्द करण्यात आलेली पैठण (Paithan) येथील नाथषष्ठी यात्रा यावर्षी साजरी होत आहे. यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी पैठणमध्ये दाखल झाले आहेत.
Aurangabad Nathsashti Sohala : सध्या देशावरील आणि राज्यावरील कोरोनाचा धोका कमी झाला आहे. त्यामुळं विविध ठिकाणच्या यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. कोरोनाच्या संकटामुळं तब्बल दोन वर्ष रद्द करण्यात आलेली पैठण (Paithan) येथील नाथषष्ठी यात्रा यावर्षी साजरी होत आहे. पांडुरंगानं श्रीखंड्याचं रुप घेऊन संत श्री एकनाथ महाराज यांच्या घरचा रांजण तब्बल 12 वर्ष भरला होता अशी आख्यायिका आहे. त्यानिमित्तानं तुकाराम बीजेपासून हा रांजण गोदावरी नदीच्या पाण्यानं भरण्यास सुरुवात झाली.
दरम्यान,मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळं नाथषष्ठी सोहळा अतीशय साधेपणानं साजरा करण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा आलेख घसरलाय. त्यामुळं पैठणच्या नाथषष्ठीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळं यंदा नाथषष्ठी पूर्णक्षमतेनं होणार आहे. नाथषष्ठीसाठी मास्क आणि लशीची मात्रा अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यभरातून नाथषष्ठीला तीस ते चाळीस हजार वारकरी पैठणमध्ये येत असतात. तब्बल दोन वर्षांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये नाथषष्ठीचा सोहळा रंगतोय. मध्यरात्री नाथांच्या जुन्या वाड्यातील पांडुरंगाला अभिषेक करत सोहळ्याची सुरुवात झाली. आज सकाळी 11 वाजता नाथांची पालखी समाधी मंदिरात पोहोचणार आहे. दोन वर्षांनी सोहळा होत असल्यानं पैठणमध्ये उत्साहांचं वातावरण आहे. नाथषष्ठीच्या पुर्वसंध्येला मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे.
आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 23 ते 25 मार्च या तीन दिवसात नाथषष्ठीचा यात्रा महोत्सव रंगणार असून वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे. कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यामुळं जिल्हा प्रशासानाने या वर्षी नाथषष्ठी महोत्सव भरवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीनं नाथनगरी भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या भक्तीनं फुलून जाणार आहे.
नाथषष्ठी यात्रा काय असते?
पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी ही आहे. या निमित्त दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. तर अष्टमीला गोपालकाला होऊन उत्सवाची समाप्ती होते. आधी हा सहा दिवसांचा महोत्सव असायचा, यंदा तीन दिवसांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवात राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक दिंडीने यात सहभागी होतात. नाथषष्ठी यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी नाथवंशांच्या प्रमुख उपस्थितीत दिंड्या आतील नाथ मंदिरातून गोदावरी नदीमार्गे समाधी मंदिरापर्यंत भजन करीत जातात. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची छबिना पालखी काढण्यात येते. तिसऱ्या व शेवटच्या दिवशी सायंकाळी नाथवंशजांच्या हस्ते काला दहिहंडी फोडून नाथषष्ठी यात्रा महोत्सवाची सांगता केली जाते.
दोन वर्षानंतर हा सोहळा संपन्न होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वारकरी भानुदास एकनाथ नामाचा गजर करत आहेत. आजचा दिवस आमच्यासाठी मोठ आनंदाचा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिल्या. दरम्यान, सकाळी 11 वाजता जुन्या वाड्यातून दिंडी निघणार असून समाधी स्थळाकडे जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज मंदीर आळंदी या ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी देखील मोठ्या संख्येनं आज भाविक येण्याची शक्यता आहे.