औरंगाबाद : नळावर पाणी भरण्याच्या वादातून झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. औरंगाबादेतील सात वर्ष जुन्या हत्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय दिला.


प्रकाश हरिश्चंद्र भुजंग आणि अमोल चाबूकस्वार या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गावातील नळावर पाणी भरणं आणि शेतीच्या जुन्या वादातून 31 ऑगस्ट 2011 रोजी पैठण तालुक्यातील नांदलगाव येथील अण्णासाहेब बनसोडे यांचं चौघांशी भांडण झालं होतं.

सय्यद निसार सय्यद हबीब, प्रकाश हरिश्चंद्र भुजंग, अमोल रघुनाथ चाबूकस्वार आणि सय्यद हबीब सय्यद अहमद या चौघांनी शिवीगाळ करुन लोखंडी फायटर आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन अण्णासाहेब यांना जखमी केलं होतं.

अण्णासाहेबांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 1 सप्टेंबर 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.