औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुन्हा होऊ घातलेली आघाडीची भीती भाजपला सतावत आहे. त्यामुळेच जर शिवसेनेशी युती झाली नाही तर महाराष्ट्रातल्या जागा कमी होतील, असा अंदाज भाजपमधील अभ्यासकांनी वर्तवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला टक्कर द्यायची असेल तर भाजपला शिवसेनेची साथ हवी आहे. त्यासाठीच भाजपा शिवसेनेला एकीकडे अल्टीमेटम देत आहे तर दुसरीकडे आता दबावतंत्राचं नवं अस्त्र बाहेर काढणार आहे.


हे दबाव तंत्र आहे ज्या लोकसभा मतदारसंघात शिवसेना निवडून आली आहे किंवा ते लोकसभा मतदारसंघ मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत, त्या ठिकाणी भाजपातील चार मुख्य नेत्यांनी सहभाग घ्यायचा.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कोअर कमिटीने रात्री तीन वाजेपर्यंत बैठक यासाठीच घेतली होती. यामुळे साम-दाम-दंड-भेद वापरुन शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आता भाजप नव्या दबावतंत्राचा वापर करत आहे.

शिवसेनेचे राज्यात 18 खासदार आहेत. भाजपने 18 ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन केलं आहे. भाजपाच्या दबावतंत्राची  पहिली सभा आज पुण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी घेतली. यापुढे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांसह अन्य दोन मंत्री शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये सभा घेणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या सूत्रांकडे आहे.

ध्यंतरी भाजपाने केलेल्या सर्व्हेत खासदारांची झालेली पीछेहाट, त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीकडे होत असलेली वाटचाल आणि शिवसेनेसोबत वाढत असलेली दरी ही महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा कमी करेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. आता भाजपाचा हे नवं दबावतंत्राचा अस्त्र किती परिणामकारक होतं याचं उत्तर येणारा काळच देईल.