Aurangabad Crime: एकीकडे सर्वत्र दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असताना, दुसरीकडे औरंगाबाद शहर दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटनेने हादरला आहे. तर तिसऱ्या घटनेत घात की अपघात याचा पोलीस तपास करत आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप होत असतानाच शहरात दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना शहरातील मोंढा नाका परिसरात तर दुसरी घटना मिटमिटा भागात घडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी धाव घेत पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.


पहिल्या घटनेत औरंगाबाद शहरातील मोंढा नाका येथील बालाजी एंटरप्राइजेसवर कामाला असलेल्या  सुरक्षारक्षकाची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार पाशू नावाची व्यक्ती बाळाजी एंटरप्राईजेस येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होती. आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशातून 4 जण या ठिकाणी आले. दरम्यान पाशू यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. चोरट्यांनी यावेळी बीडीचे काही कार्टून्स चोरून नेले आहे. मात्र सकाळी घटना उघडकीस आली त्यावेळेस पाशू यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच डीसीपी उज्वला वनकर आणि क्रांती चौक पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला आहे.


आणखी एक मृतदेह सापडला...


मोंढा नाका येथील घटना ताजी असतानाच, औरंगाबाद शहर पोलीस हद्दीतील मिटमिटा भागात आणखी एक मृतदेह सापडला आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडाने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला आहे. मात्र मृतदेहाची अजूनही ओळख पटलेली नाहीये. त्यामुळे शहरात दोन खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.


तिसऱ्या घटनेचा तपास...


शहरात दोन खुनाच्या घटना घडल्या असतानाच, वाळूज पोलीस ठाणे हद्दीत सुद्धा तीन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलेल्या एका तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.अय्युब उर्फ कालू  इस्माईल पठाण (वय 30 वर्षे रा. पठाणवाडा बिडकीन, औरंगाबाद) असे या तरुणाचे नाव आहे. त्यामुळे आता हा घात की अपघात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर हा घातपात असल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस तपासानंतर याबाबत खरे काय याची स्पष्टता होणार आहे.