औरंगाबाद :  औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह (Aurangabad Corona Positive fraud Story) दाखवत त्यांच्या  जागी उपचारासाठी बनावट रुग्ण पाठवल्याच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. हा सगळा प्रकार इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे कमावण्यासाठी सगळा प्रकार केला गेला. पण या सगळ्या प्रकरणात पालिकेच्या कोरोना तपासणी पथकाने कोरोना सॅम्पल न घेताच पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला गेल्याचे गंभीर प्रकरण समोर आलं आहे. 


कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण उपचारासाठी आल्याने औरंगाबाद पालिका आरोग्य अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. एकच प्रश्न पडला की पॉझिटिव्ह रुग्णाच्या जागी बनावट रुग्ण उपचारासाठी का आले आणि प्रश्नानं पोलीस आणि आरोग्य विभागाची झोप उडवली.  इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी हा सगळा खटाटोप केला गेल्याचं नंतर समोर आलं. 


औरंगाबादच्या सिद्धार्थ गार्डन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कोरोना अँटीजन टेस्ट करण्यात आली आणि आपण पॉझिटिव्ह असल्याचं सांगत गौरव काथार आणि गगन पगारे नाव असल्याचं दोन तरुणांनी सांगितलं. शहरातील मेल्ट्रोन कोविड सेंटरवर उपचारासाठी आले. पण हे तरुण पॉझिटिव्ह नसून दुसऱ्याच्या जागी उपचारासाठी आल्याचं समोर आलं.पुढे पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण दोन मध्यस्थ आणि 2 बनावट रुग्णाचा समावेश होता.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तर हे सगळं प्रकरण बनावट असल्याचं समोर आलं. 


या प्रकरणाची सुरवात ज्या ठिकाणाहून झाली तिथेच प्रकरणाचं मूळ होतं. यातील पॉझिटिव्ह आलेलं 2 तरुण 12 तारखेला सिद्धार्थ गार्डनमध्ये कोरोना तपासणीसाठी गेलेले नव्हते तरीही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह देण्यात आला. त्यामुळे तपासणी करणार पथकही या फ्रॉडमध्ये सहभागी होतं.  पोलिसांनी या प्रकरणी गौरव काथार नावाच्या तरुणाची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण समोरं आलं.


दोन लॅब टेक्निशियनला कामावरून काढून टाकले
औरंगाबाद महापालिका कोविड सेंटरमध्ये बनावट कोरोना रुग्ण दाखल झाल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन लॅब टेक्निशियनला कामावरून काढून टाकले आहे. सचिन शिनगारे आणि सागर साबळे असं त्यांचं नाव आहे. या दोघांनी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे बनावट प्रमाणपत्र दोघांना दिले होते, असं समोर आलंय. हेल्थ इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी खोटे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आता महापालिका त्याची चौकशी करीत आहे. अगोदर व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह दाखवायचे, त्यानंतर त्याला खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी रेफर केले जायचे आणि तिथून हेल्थ इन्शुरन्सची रक्कम काढायची. मिळालेली रक्कम वाटून घ्यायची असा प्लॅन असल्याचं दिसून आलंय.