Nawab Malik on Anil Bonde : Amravati Violence : अमरावतीमधील हिंसाचारावरून अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर आरोप केला आहे. अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप मलिक यांनी शेअर केली असून बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. अमरावतीतील हिंसाचारानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात मलिक यांनी आता अनिल बोंडे यांच्यावर आरोप केला आहे.
नवाब मलिकांनी ट्विटर अकाउंटवरुन ट्विटर स्पेसचा एक ऑडिओ शेअर केला आहे. "अमरावतीतील भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप ऐका... झूठ बोले कौआ काटे...", अशा कॅप्शनसह ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे यांनी अमरावती दंगलींचं समर्थन केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिकांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे काय म्हणतायत?
नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ट्विटर स्पेसच्या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल बोंडे म्हणतायत की, "गोध्रा दंगलीनंतर अहमदाबादेत दंगली झाल्या नाहीत. दरवर्षी अहमदाबादेत काहीतरी करून दंगली व्हायच्या. मात्र मोदी सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून तिथे दंगली झाल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री होते, तेव्हा दंगली झाल्या नाहीत. भाजपाचं सरकार जिथे सत्तेस असतं तिथे दंगली करण्याची हिंमत कुणाची नसते. ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं त्या-त्या ठिकाणी दंगली होतात."
दरम्यान, अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती.
अमरावती हिंसाचाराप्रकरणी अनिल बोंडेंना जामीन
माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होती.