मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे  माजी महापौर  विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे.  विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह तीन नगरसेवकांना अटक  केल्याची माहिती देखील समोर आली आहे.


किरीट सौमय्या हल्लाप्रकरणात माजी महापौर आणि काही शिवसैनिकांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. महाडेश्वर यांच्यासह पोलिसांनी तीन नगरसेवकांना देखील अटक केली आहे. किरीट सोमय्या हल्ल्याप्रकणी पोलिसांनी चार जणांना पोलिस स्थानकात बोलवले आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, हाजी खान, चंद्रशेखर वैगणकर
दिनेश कुबल यांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


 राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या 23 एप्रिलला खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.  राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच  देखील फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले. त्यावेळी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते. सोमय्यांच्या वाहनचालकाने शिवसैनीकांवर गाडी अंगावर घालण्याचा प्रय्तन केल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केली. या संदर्भात सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी महाडेश्वर पोलिस स्थानकात गेले होते. 


किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याच्या हेतूने हा हल्ला झाल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, "पोलीस स्टेशनच्या आवारात हा हल्ला झाला असून राज्याची अवस्था ही पश्चिम बंगालपेक्षा वाईट झाली आहे. पोलिसांनी राणांवर गुन्हा दाखल केला पण शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला नाही. राज्य शासन पोलिसांच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे. याचं उत्तर आता भाजप त्याच प्रकारे देईल."