Gunaratna Sadavarte : एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर पोलीस मुंबईतील ऑर्थर जेलकडे घेऊन रवाना झाले आहेत.
कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्यांना आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवासंची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर कोर्टात दाखल झाले होते. 2020 मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. मात्र, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत.
कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंना आर्थर जेलमध्ये दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा मिळू शकतो. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्यामुळे सदावर्तेंवर कोल्हापूर मधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 15 एप्रिल रोजी कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 20 तारखेला सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाल्यानंतर 21 तारखेला कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
महत्वच्या बातम्या
सदावर्तेंच्या प्रॉपर्टीचं घबाड; घरात नोटा मोजण्याचं मशीन, केरळवरून भारदस्त कार घेतल्याचा सरकारी वकिलांचा दावा
Gunaratna Sadavarte यांच्या इमारतीच्या गच्चीवर शिजत होता हल्ल्याचा कट? पोलिसांचा तपास सुरू