vijay wadettiwar on Navneet rana and ravi rana : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं आहे. राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी दोघांना 'नीच' आणि 'ह...मी' या दोघांनाही संबोधले आहे.  वडेट्टीवार यांनी म्हटलं की, नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यामुळे सध्या देशात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करून मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली आहे, त्यांचा हेतू काय आहे, मला माहीत नाही. वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या गलिच्छ भाषेचा निशेध केला आहे. 


वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले...
'मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा वाचावी, असे नवनीत राणा सांगतात, त्यांनी वाचले नाही तर आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा शिकवू.  तुम्हाला जे बोलायचे आहे ते बोला, जिथे वाचायचे आहे तिथे जाऊन वाचा. उद्धव ठाकरेंनी बोलायला हवं असं म्हणतात. ते तुमच्या बापाचा नोकर आहेत का? असे घृणास्पद, उद्धट आणि ह**मी आणि क...ने लोक, जे या देशात आहेत आणि आपापसात भांडण लावण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहेत. प्रत्येक घरात हनुमान चालीसा असते, लोक ती वाचतात. हिंदू धर्मात लग्नाआधी हनुमानजीचे दर्शन होते.


मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर देखील सडकून टीका केली आहे.  भोंगा उतरवण्याची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंचा *गा फाटलाय अशी टीका वडेट्टीवार यांनी केलीय. राज ठाकरे हे रंगबदलू आहेत, त्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलला आहे असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. चंद्रपुरातल्या बल्लारपूरमध्ये काल काँग्रेसकडून आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते.


तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही...


वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं..पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो. तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरण्याऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते अशांचं जोपर्यंत महिला खेटरं पूजन करणार नाही तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही, असं वाघ यांनी म्हटलं आहे.