Teesta Setalvad : गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. मुंबईतील गुहू येथील राहत्या घरातून सेटलवाड यांना ताब्यात घेण्यात आले. अहमदाबाद गुन्हे शाखेने माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार यांना देखील अटक केली आहे. रविवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले जाणार आहे.


माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि आरबी श्रीकुमार यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदाबाद शहर पोलीस गुन्हे शाखेचे निरीक्षक दर्शनसिंह बी. ब्रॅड यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.   




मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात एटीएसची दोन पथके आज मुंबईत पोहोचली. एक टीम सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गेली आणि दुसरी टीम मुंबई पोलिसांसह तिस्ता सेटलवाडच्या जुहू येथील घरी गेली. यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. एटीएस टीमने तीस्ता यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि समर्थकांनी तपास पथकाशी वाद घातला.  


गुजरात दंगलीवरील एसआयटीच्या अहवालाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने 24 जून रोजी फेटाळून लावली होती. झाकिया जाफरी यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तीस्ता सेटलवाड यांची अधिक चौकशी करण्याची गरज आहे, कारण तीस्ता या प्रकरणात झाकिया जाफरी यांच्या भावनांचा स्वतःच्या फायद्यासाठी छुप्या पद्धतीने वापर करत होत्या.
 
2002 च्या गुजरात दंगलीमध्ये झाकिया जाफरी यांचे पती एहसान जाफरी यांची जमावाने हत्या केली होती.   एहसान जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीच्या अहवालाला आव्हान दिले आहे.


एसआयटीच्या अहवालात राज्यात मोठ्या पदावर असलेल्या लोकांना क्लीन चिट देण्यात आली होती. एसआयटीने गोध्रा ट्रेन आगीची घटना आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीला भडकावण्याचा राज्यातील उच्च अधिकार्‍यांचा कट असण्याची शक्यता नाकारली होती. 2017 मध्ये गुजरात हायकोर्टाने एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टविरुद्ध झाकिया यांनी तक्रार फेटाळली होती.