मुंबई: महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये म्हणजे सीबीएसई, आयसीएसई आणि केंब्रीज शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावी विद्यार्थ्यांचे मराठी विषयांचे मूल्यांकनाकरिता अ,ब,क, ड श्रेणी स्वरूपात केले जाणार आहे. या मूल्यांकनाचा समावेश परीक्षा मंडळाच्या इतर विषयांच्या गुणांच्या मूल्यांकनामध्ये करण्यात येणार नाही. 


1 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार  राज्यातील सर्व परीक्षा मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज आणि अन्य केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा सक्ती या निर्णयानुसार करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मंडळ सोडून इतर मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषयांच्या मूल्यांकनाबाबत सुलभता यावी यासाठी योग्य निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती आणि त्यानुसार इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयांच्या मूल्यांकनाच्या संदर्भात आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.


त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयांचे मूल्यांकन हे श्रेणी स्वरूपात अ, ब, क, ड यानुसार करण्यात येईल. 2020 मध्ये मराठी भाषा सर्व मंडळाच्या शाळांमध्ये सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर कोरोना काळात मराठी भाषा इतर मंडळाच्या शाळांमध्ये नियमित अध्ययन होत नसल्याने शिकवताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. शिवाय मूल्यांकना संदर्भातसुद्धा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता हा शासन निर्णय जारी केल्यानंतर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे श्रेणी पद्धतीने होणार आहे.


राज्य शासनाकडून माय मराठीला सापत्न वागणूक?


राज्य शासनाने पुढील तीन वर्षासाठी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयांचे मूल्यांकन श्रेणी स्वरुपात होणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मराठी विषयाचे स्थान फक्त  अ-ब-क-ड पुरते म्हणजे 'श्रेणी'पुरतीच राहिल्याची टीका केली जात आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याच्या निर्णयाला तीन वर्षांकरिता स्थगिती मिळाल्याचं सांगण्यात येतंय. CBSE, ICSE, केम्ब्रिजच्या शाळांमध्ये आठवीनंतरच्या इयत्तांना मराठी विषय विद्यार्थ्यांच्या एकूण मूल्यांकनात धरण्याची गरज नाही. त्यामुळे पुढील तीन वर्षांकरिता मराठी भाषा केवळ 'श्रेणी' पुरतीच राहिल्याचं चित्र आहे. 


ही बातमी वाचा :