नागपूर: समृद्धी महामार्गावर होणाऱ्या रोजच्या अपघाताचे प्रमाणे थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच आता कडक उन्हामध्ये  सिमेंट रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांना टायर फुटण्याचा धोका असतो. हे बघता बघता समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने कंबर कसली असून टायर कालबाह्य झालेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर धावू न देता परत पाठवले जाणार आहे. तर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमच्याद्वारे वाहनांच्या ओहरस्पीडवर पाळत ठेवली जात आहे.


तुम्ही जर का समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर आधी आपल्या वाहनाचे तयार नीट चेक करून घ्या. कारण तुमच्या टायरचे खूप जास्त घर्षण झाले असेल आणि त्याने 1.6 mm थिकनेस मर्यादा ओलांडली असेल तर परिवहन विभागाचे पथक तुम्हाला समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यास मज्जाव करू शकते.


11 डिसेंबर 2022  रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले होते. आजवर समृद्धी महामार्ग जसा त्याच्या उत्कृष्ट कामाने, गुणवत्तेने चर्चेत राहिला तसाच तो यावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकेने देखील सतत चर्चेत राहिला. परिवहन विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार  समृद्धी महामार्गावर आजवर 950 च्यावर छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना पुढे आल्या असून यातील 41 अपघातात हे प्राणघातक अपघात ठरले. धक्कदायक बाब मध्ये 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेकडाऊन मुळे झाल्याचे पुढे आले. तर 15 टक्के अपघात हे टायर कमजोर असल्यामुळे झाले. 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करून चालकांचा वेग नियंत्रत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार  समृद्धी महामार्गाच्या एंट्री पॉईंट आणि एक्झिट पॉईटवर वाहनाने कापलेले अंतर किती वेळात पूर्ण केले यावरून वाहनाचा वेग काढला जातो आणि जर का वेग मर्यादेचे उलंघन केले असल्याचे आढळल्यास त्या वाहनावर कारवाई म्हणून त्याचे 20 मिनिटे  थांबवून उद्बोधन केले जाते.


यासाठी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर नागपूर, जालना, वेरूळ व कारंजा लाड या चार ठिकाणी परिवहन विभागाचे पथक नेमले असून तेथे वाहनांची टायर तपासणी आणि एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीमने वाहनाच्या वेगावर पाळत ठेवली जात आहे. आतापर्यंत या मोहिमे अनंतर्गत 64 वाहनांवर एक्सिट मॅनेजमेंट सिस्टीमने कारवाई करण्यात आली.


तर 294 वाहनांच्या टायरची स्थिती तपासण्यात आली. शेवटी आजवरचे झालेल्या सर्व अपघातांना तांत्रिक करणासोबत मानवी चुका तितक्याच जबाबदार आहे. त्यामुळे शेवटी नियमाचे पालन करा आणि अपघात टाळा याच मूलमंत्राचे पालन करणे हा यावरच रामबाण उपाय आहे.