Maharashtra Heat Stroke Death: खारघरमध्ये झालेल्या उष्माघाताच्या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारने अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात मोकळ्या मैदानावर कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. खारघरमध्ये नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये दहा महिला आणि चार पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणी सात रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. घडलेल्या प्रकारानंतर आता महाराष्ट्र सरकारने मोकळ्या मैदानावरील कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.


मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्यात जोपर्यंत उष्णतेची लाट आणि कडाक्याचं ऊन आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत मोकळ्या जागेवर कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार लवकरच जीआर (शासकीय ठराव) जारी करणार आहे, भाजप नेते आणि पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे.


वातावरण तापलं; राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अॅक्शन मोडमध्ये


खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती भयावह असू शकतो हे दिसून आले. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी नागपुरातील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (VNIT) जबाबदारी सोपवली असून त्याचा अहवाल लवकरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सोपवला जाणार आहे. याच अभ्यासात काही महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत, ज्याचा विचार शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने करण्याची गरज आहे.


उन्हाळ्यात दिवसाचे कमाल तापमान नवनवीन उच्चांक मोडत असताना, किमान तापमानातही लक्षणीय वाढ होत आहे का? आणि त्यामुळेच भारतातील शहरं आधीच्या तुलनेत जास्त उष्ण होत चालली आहेत का? दिवसा तापणारी शहरं रात्रीही तापत असल्यामुळे शहरी भागात उष्माघाताची समस्या वाढली आहे का? तज्ञांच्या मते सध्या असेच काहीसे होत आहे.


विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील वास्तुकला आणि नियोजन विभागाची टीम सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोपवलेल्या जबाबदारीनुसार संपूर्ण देशासाठी एकसंघ "हीट ॲक्शन प्लान" संदर्भात अभ्यास करत आहे. त्यांच्या मते, शहरांमध्ये दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत असतानाच रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होत आहे आणि त्यामुळेच 24 तास एकंदरीतच तापमान जास्त राहून भारतातील शहरं जास्त उष्ण होत चालली आहेत. त्यामुळेच उष्माघातासारखी समस्या वाढून धोका वाढत आहे.


या कारणांमुळे वातावरणात उष्णता:



- वाढलेली वाहनांची संख्या आणि प्रदूषण
-  सर्वत्र सिमेंट काँक्रीटचे रस्ते असणे
- बांधकामांची बदललेली पद्धत, मातीच्या विटांऐवजी सिमेंटच्या विटांचा वाढता वापर
- इमारतीच्या बाहेरील भागांवर काचेचे आवरण
- वातानुकूलित यंत्रांचा जास्त वापर
अशा अनेक कारणांमुळे शहरांमध्ये संध्याकाळनंतर अपेक्षेप्रमाणे कुलिंगची प्रक्रिया होत नाही आणि त्यामुळे भारतातील शहरं जास्त उष्ण बनत आहेत.