या प्रकरणात सत्ताधारी पक्षाचा दबाव वाढत चालला असून, ज्यावेळी अश्विनीचा खून झाला त्यावेळी एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याच्यासोबत सत्ताधारी गटाचे दोन आमदार होते. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत ? याचा खुलासा पोलिसांनी करावा अशी मागणीही कुटुंबियांनी केली. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
वर्षभरापूर्वीच हत्येची कल्पना
अश्विनी बिद्रे यांचा खून झाल्याची माहिती एक वर्ष पूर्वीच पोलीस खात्याकडून मिळाली होती. मात्र गेली वर्षभर या प्रकरणातील संशयित आरोपी अभय कुरुंदकर हा पोलिसांच्या समोर असूनदेखील त्याला ताब्यात घेतलं नाही. उलट तो या केसमधून व्यवस्थित बाहेर पडावा म्हणून नवी मुंबईचे पोलीस कमिशनर हेमंत नगराळे आणि संशयित आरोपी अभय कुरुंदकर याचा लहान भाऊ पोलीस आधिकरी संजय कुरुंदकर तसंच ठाणे ग्रामीणचे पोलीस प्रयत्न करत होते, असा आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला.
पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी पोलीस अधिकारी संजय कुरुंदकर हा गेली वर्षभर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलं.
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं आणि त्यासाठी सरकारी वकील उज्जवल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी अश्विनीचा लहान भाऊ आनंद बिद्रे यांनी केली आहे.
गुगलकडून व्हिडीओ मागवा
सध्या मीरा भाईंदरच्या खाडीत अश्विनीच्या मृतदेहाची शोधमोहीम सुरु आहे. दूषित पाणी गाळामुळं पोलिसांच्या हाती काही लागलेलं नाही. त्यामुळं पोलिसांनी समुद्राच्या तळातून तेल काढणाऱ्या ongc आणि रिलायन्स कंपनीकडे असणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कारवाया अशी मागणी त्यांनी केली. तसंच ज्या दिवशी अश्विनीचे प्रेत समुद्रात फेकलं, त्याचा व्हिडिओ गुगल कंपनीकडून राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.
आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणासाठी वेळ द्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्र्यांकडं गृह खाते असल्याने, या प्रकरणात त्यांनी लक्ष घालण्याची मागणी बिद्रे कुटुंबीयांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं अभय कुरुंदकरांचं फार्म हाऊस आहे. या परिसरात अश्विनीच्या शरीराचे काही अवशेष नष्ट केले असल्याची शक्यता बिद्रे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या पत्रकार परिषदेला अश्विनीचे वडील जयकुमार गोरे उपस्थित होते. त्यांना या संदर्भांत प्रश्न विचारल्यानंतर आपले अश्रू अनावर झाले. काहीवेळ स्तब्ध राहून त्यांनी या प्रकारचा निपक्ष तपास होऊन आरोपीला शिक्षा करण्याची मागणी केली.
संबंधित बातम्या