मुंबई: एबीपी माझाने दाखवलेल्या एमपीएससी परीक्षा घोटाळ्याच्या बातमीनंतर, विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला.

घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.

एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट सरकारला माहित आहे. हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं. सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.

200 पेक्षा जास्त डमी उमेदवार आहेत, तर  एक हजार पेक्षा जास्त मुलं बोगसरित्या शासकीय सेवेत भरती झाली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

अजित पवार :

मुलं मरमर अभ्यास करतात, ढ पोरं दुसऱ्यांना परीक्षेला बसवतायत आणि पास होत आहेत. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोकं कामाला लागलेत. त्यांना कमी केलं पाहिजे. बोगस परीक्षार्थींमुळे बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल. बोगस लोक क्लासवन अधिकारी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. पात्रता नाही, लायकी नाही ते शासकीय सेवेत लागले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

राधाकृष्ण विखे पाटील

हे प्रकरण गंभीर आहे. बऱ्याच कालावधीपासून हा घोटाळा सुरु आहे. एवढा मोठा घोटाळा आहे, पण सरकार त्याची दखल घेत नाही.  जिल्ह्या-जिल्ह्यात विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे.

40 जणांपैकी 15 जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.

मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा गेली आठ वर्षे महाराष्ट्रात सुरु आहे. एमपीएससीच्या परिक्षेत 1 हजारहून अधिक उमेदवारांनी डमी उमेदवार बसवून, नोकरी मिळवल्याचं उघड होवू लागलं आहे.

उमेदवार पुरवणारी टोळी प्रत्येक डमी उमेदवारीसाठी 20 लाख घेत होती. सध्या सेवेत असेलेले अधिकारी परिक्षा देत होते. परिक्षार्थी मुली, महिलांचं लैगिंक शोषण सुरु होतं, ज्या तरुणाने हा घोटाळा उघडकीस आणलाय, त्याच्यावर दोन वेळेस जीवघेणे हल्ले झाले आहेत.



संबंधित बातम्या

बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणारे 15 अधिकारी अटकेत