CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मॅरेथॉन पद्धतीनं काम सुरु आहे. काल दिवसभर मंत्रिमंडळ बैठक, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत आणि कार्यक्रम यासह महत्वाच्या सरकारी कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्री पावणे एक वाजता एका मेळाव्याला पोहोचले. मध्यरात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनासाठी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने गुरुवारी आले होते, पण रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला नव्हता. अखेर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री पावणे एक वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून समर्थकांचे कौतुक केले. 


विशेष म्हणजे सुरुवातीला शिंदे यांनी त्यांच्यासाठी ठेवलेली विशेष खुर्ची उचलायला सांगितली आणि सामान्य खुर्चीवर ते बसले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  गुरुवारी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्म मुंबईत आल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री व शिंदे समर्थक आमदार गेले होते. तिथे त्यांना उशीर झाल्याचे सांगण्यात आले.


आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केलीय. मध्यरात्री असा मेळावा कोण घेऊ शकत नाही. जे काही चाललं होतं त्यात संजय शिरसाट पुढे होते, असं सांगत त्यांनी शिरसाट यांचं कौतुक केलंय. मी शिरसाट यांना विचारतो की तुम्ही मुंबईत असतात मग मतदारसंघात काय करायचं? पण ते बोलले होते, मतदारसंघ ओके आहे, आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय, असं शिंदे म्हणाले.  मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, सहा महिन्यात एक चित्र दिसत गेलं, जे सगळीकडे आम्हाला घातक दिसू लागलं. आम्ही खूप प्रयत्न केलं होते पण काहीच झालं नाही. आम्हाला लक्षात आलं की राष्ट्रवादी कॉंग्रेस सगळीकडेच आमदारकीची तयारी करत होते. पण आमदारांना निधी मिळत नव्हता, यात आमदारांचा स्वार्थ नाही, पण जनतेची कामं लक्षात घ्यावी लागतात. आज कार्यकर्त्यांना काय मिळालं? कामं मिळाली? गुन्हे दाखल झाले. न्याय मिळाला नाही. बाळासाहेब सांगायचे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही धर्मवीर घरात घरात पोहोचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही. ज्यांना आवडला नाही तर नाही आवडला आम्ही पुढे जाणार, असे शिंदे म्हणाले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिव्यांग कार्यकर्त्यांचा सन्मान
यावेळी त्यांनी औरंगाबादहून मुंबईला आलेल्या विनोद यादव या कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्टेजवर बोलवून सन्मान केला, तसेच त्याला स्टेजवर बसण्याची संधी दिली हे चित्र पाहताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. संजय शिरसाट यांनी भाषण सुरु असताना त्यांनी सांगितले, की हा कार्यकर्ता थेट औरंगाबादहून आला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात करण्याआधी या दिव्यांग कार्यकर्त्याला स्टेजवर बोलवून त्याचा सन्मान केला.