‪Professor Dr. Indra Mani Mishra :  प्रा. डॉ इंद्र मणी मिश्रा यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी डॉ इंद्र मणी यांची नियुक्ती जाहीर केली. कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ 6 मे  2022 रोजी संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ इंद्र मणी मिश्रा यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेतून कृषी अभियांत्रिकी या विषयात पदव्‍युत्तर तसेच पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य आणि कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. 


कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपाल यांनी एनसीईआरटीचे निवृत्त महासंचालक प्रा. जगमोहन सिंह राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. यात भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए के सिंह आणि राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या निवडीची घोषणा केली. 


मा. प्रा. डॉ इंद्र मणी मिश्रा यांचा परिचय
नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (संशोधन) म्हणून कार्यरत आहेत. प्रा. इंद्रा मणी मिश्रा यांचे कृषि यांत्रिकीकरणात मोठे योगदान असून पिक अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू शेती व भाजीपाला यांत्रिकीकरण, लहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकरणे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान देशातील 18 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आजपर्यंत संशोधन मार्गदर्शक म्‍हणून 20 पीएचडी आणि 12 एम. टेक. पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले असून त्‍यांची 140 पेक्षा जास्‍त शोधनिबंध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत.


कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी गठित केलेल्‍या समितीचे निमंत्रक म्हणून काम करून भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका त्‍यांनी बजावली आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डिझाइन इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. देशातील विविध क्षेत्रांसाठी विशेषतः ईशान्य प्रदेशासाठी यांत्रिकीकरण धोरण तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांसह उत्तर पूर्व डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कार्यक्रमाचे समन्वयक म्‍हणून कार्य केले आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI