Ashadhi Wari 2023 : राज्यातील लाखो वारकऱ्यांना (Warkari) सरकारने दिलासा दिला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबवण्यात येईल.
यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास एक लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल.
वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करताना सांगितले.
विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा
यंदा प्रथमच दर्शन रांगेत प्रत्येक 50 मीटरवर दर्शन रांग वेगाने पुढे नेण्यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणली आहे. त्यामुळे आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरु केला आहे. यामुळे यात्रा कालावधीत 30 -30 तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे. विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबतंच जात असतो. याचा फटका वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांना बसत असतो.
यावर्षी संपूर्ण दर्शन रांगेत दार 50 मीटरवर निरीक्षक नेमून त्यांना बिनतारी यंत्रणा दिली जाणार आहे. एखाद्या ठिकाणी काही गडबड दिसून आल्यास तातडीने तिथे सुरक्षेतील टीम पोचून घुसखोरी रोखेल. या व्यवस्थेमुळे दर्शनाची रांग न थांबता वेगाने पुढे पुढे जात राहिल आणि यामुळे दर्शन रांगेतील जवळपास 7 ते 8 तसंच वेळ कमी केला जाणार आहे. याशिवाय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याच व्हीआयपीला दर्शन मिळणार नसल्याने घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपीन पूर्णपणे पायबंद बसणार आहे. याचा फायदाही दर्शनाचा वेळ कमी होण्यात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या यंत्रणा राबविली जाणार असून ज्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना वेगाने दर्शन घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले आहे.