Nashik Anjneri Ropeway : नाशिकच्या (Nashik) अंजनेरी आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी रोप वे तयार केला जाणार आहे. 5.7 किलोमीटरच्या रोप वे ची लांबी असणार आहे, केंद्र सरकारच्या माध्यमातून रोप वे चे काम होणार असून साधारणपणे पावणेचारशे कोटी रुपये खर्च प्रस्तावित ठेवण्यात आला आहे. मात्र या रोप वेला पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ब्रम्हगिरी ते अंजनेरी (Bramhgiri To Anjneri) रोपवेसाठी निविदा काढण्यात आली आहे. एकीकडे अंजनेरी पर्वतावर दुर्मिळ वनस्पती आहे. गिधाडांचे संरक्षित क्षेत्र आहे. परिसरात जंगल आहे. त्याला धोका पोहचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर ब्रह्मगिरी पर्वत परिसरात होणाऱ्या उत्खननाचा मुद्दा एबीपी माझा (ABP Majha) ने उपस्थित केल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताचे सीमांकन करून संरक्षित क्षेत्र घोषित करावे. तिथे विकास कामे करू नका, अशी मागणी या आधीच पर्यावरण प्रेमींनी केली आहे. हे सर्व विरोध झुगारून रोपवेच्या कामाला गती दिली जात असल्याने पर्यावरण प्रेमी आक्रमक आहेत तर दुसरीकडे पर्यावरणाला कोणतीच बाधा पोचणार नाही, इकोफ्रेंडली प्रोजेक्ट असल्याचा दावा खासदार हेमंत गोडसे यांनी केला आहे. 


याआधी अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी रस्ता बनविण्याचा घाट घालण्यात आला होता, मात्र  एबीपी माझाच्या बातमीनंतर पर्यावरण प्रेमींनी त्याला विरोध केला होता. तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्याला स्थगिती दिली होती. आता पुन्हा रोप वे बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असून निविदा मागविल्या जात असल्याने सरकार काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील पेगलवाडी परिसरात मुख्य स्टेशन बनविले जाणार असून तिथुनच अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी एक मार्ग आणि ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी दुसरा रोपवे असणार आहे.


31 जुलैपर्यंत मागविल्या निविदा 


दरम्यान बहुचर्चित असलेल्या 5.8 किमी अंतराच्या ब्रह्मगिरी आणि अंजनेरी रोपवेसाठी पहिल्यापासून पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जात आहे. महिनाभरापूर्वी निविदा निघणार अशी चर्चा सुरु होती. 'रोप-वे'चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाल्यानंतर 376 कोटी रुपयांच्या कंत्राटासंदर्भातील कार्यवाही सुरू झाली आहे. एनएचएलएमएलने त्यासंदर्भात निविदा मागवल्या असून पेगलवाडीनजीक मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनास चालना मिळावी, यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. त्यानुसार आता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. निविदा कंपनीने 31 जुलैपर्यंत मागविल्या असून आता लवकरच रोपवे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.