Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळाही 13 जूनला झाला. हरिनामाचा गजर करीत पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज अंबाजोगाई येथे मुक्काम 


शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम अंबाजोगाई या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी लोखंडी (सावरगांव) येथून प्रस्थान करेल तर रात्री पालखीचा मुक्काम बोरी (सारगांव) येथे असणार आहे. 


माता रूक्मिणीच्या पालखीचा आज नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे मुक्काम 


माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज रात्री नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच शनिवारी 26 जून रोजी ही पालखी सकाळी नेहरू चौक, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथून प्रस्थान करेल. तर, रात्री काळा मारोती संस्थान, अंबेजोगाई येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. 


संत मुक्ताईच्या पालखीचा आज बीड बालाजी मंदिर येथे मुक्काम


यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी बीड बालाजी मंदिर मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच रविवारी 26 जून रोजी ही पालखी आहिरवडगांव येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम पाली या ठिकाणी असणार आहे. 


संत निवृत्तीनाथ पालखीचा आज अहमदनगर येथे मुक्काम 


संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज अहमदनगर मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 26 जून रोजी पालखी सकाळी अहमदनगर येथून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री साकत येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे दर्शन पाहता येणार आहे. 


संत नामदेवांच्या पालखीचा आज गंगाखेड येथे मुक्काम 


दोन वर्षांनंतर पालखीच्या सोहळ्याने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमली आहे. भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराज (Sant Namdeo Maharaj) यांची पालखी 19 जून रोजी नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे रवाना झाली. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते. मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे. पालखीचा आजचा मुक्काम गंगाखेड येथे असणार आहे तर, उद्या म्हणजेच 26 जून रोजी पालखीचा मुक्काम उकडगाव येथे असणार आहे.   


महत्वाच्या बातम्या :