Shivsena Meeting : पक्षातील बंडाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत असून आता पक्षातील बंड मोडून काढण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या राष्ट्रीय कार्यकारणीत काही ठरावही मंजूर करण्यात आले आहेत. आता यापुढील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना पक्ष प्रमुखांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार कारवाई होणार आहे.
शिवसेनेच्या या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही असा ठराव ही राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे ठरवल्याचे असल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठरावाला अतिशय महत्त्व आहे. शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंचं नाव कुणालाही वापरू देऊ नये यासाठी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार आहे.
>> कोणते ठराव मंजूर?
> निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना, पहिला ठराव पारित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक
> शिवसेनेशी बेईमानी करण्यावर कठोर कारवाई करण्याचे सर्वाधिकार ही राष्ट्रीय कार्यकरणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना देत आहे असा ठराव ही या बैठकीत मंजूर करण्यात आला. हा ठराव शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडला होता.
> त्याशिवाय, बंडखोरांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. या ठरावामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून आता बंडखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे.
> शिवसेनेने आपल्या ठरावात पुन्हा एकदा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाशी प्रतारणा करणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम वगळता इतर नेते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. या बैठकीत अनंत गीते हे पूर्वपरवानगीने अनुपस्थित आहेत. तर, एकनाथ शिंदे आणि रामदास कदम हे अनुपस्थित आहेत.