Ashadhi Wari 2022 :  दोन वर्षांपूर्वी पायी दिंडी सोहळादरम्यान अनेक अपघातांच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदा वारी मार्गावर वाहनांची वाहतूक बंद करावी ही वारकऱ्यांनी केलेली मागणी प्रशासनाने पूर्ण केली आहे. त्यामुळं दिंडी दरम्यान फक्त एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे, अशी माहिती नाशिक पोलिसांकडून मिळाली आहे. राज्यातील सर्वच दिंडी मार्गावर हा नियम लागू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने शिवशाही बसने फक्त मानकऱ्यांसह 25 वारकरी पंढरपूरकडे रवाना होत होते. यामुळे वारकऱ्यांचा हिरमोडही झाला होता. यंदा मात्र पायी दिंडीला परवानगी देण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून कालपासूनच मोठ्या संख्यने वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. कधी एकदा विठुरायाचं दर्शन घेता येईल याचीच वाट ते बघत आहेत. 


दोन वर्षाच्या खंडानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहे.  याच पार्श्वभूमीवर वारकरी मोठ्या संख्येने त्र्यंबकनगरीत दाखल झालेत. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गाव प्रदिक्षणेनंतर पालखीचा पहिला मुक्काम नाशिक जवळच्या सातपूर गावात असेल. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.