मुंबई : आयुष्यातील पहिलं गाणं गायलं ते 10 वर्षाची असताना, कोल्हापुरात ते पहिलं गाणं गाताना मी थरथरत होते असा अनुभव ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सांगितला. आशा भोसले यांना आज राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हा अनुभव सांगितला. 


याच पुरस्कारासाठी 90 वर्षे थांबलीय


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी आशा भोसले म्हणाल्या की, "हा पुरस्कार माझ्यासाठी भारतरत्न आहे. माझ्या घरच्या लोकांना माझी आठवण आहे याचा आनंद आहे. या पुरस्कारासाठी मी 90 वर्षे थांबलेय, आता कदाचित जाईन. मुलगी माहेरी आलीय, डोक्यावरुन हात फिरवल्यासारखं वाटतंय. मी महाराष्ट्राची मुलगी याचा अभिमान आहे.'


पहिलं गाणं गाताना थरथर कापत होते 


अभिनेता सुमित राघवनने आशा भोसले यांना बोलतं केलं. आयुष्यातील पहिलं गाणं गाताना कसं वाटलं असा प्रश्न विचारला असता आशा भोसले म्हणाल्या की, "कोल्हापुरात 10 वर्षे वयाची असताना, 1943 साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. 1946 साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत 10 हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी येथपर्यंत आलेच नसते. असंच आपलं प्रेम राहू दे."


गाणं गाताना असं कोणी सांगू शकत नाही की ते गाणं लोकांना चालेल की नाही, पण माझी गाणी मात्र चालली, गेली 60 वर्षे लोकांनी माझ्या गायिकेला स्वीकारलं हे विशेष असं आशा भोसले म्हणाल्या. 


आर डी बर्मन डिफिकल्ट म्युझिशियन 


ज्या पद्धतीची गाणी गायली त्या व्यक्तीरेखेची एकरुप होऊन गायली असं सांगत आशा भोसले म्हणाल्या की, जयदेव, मदन मोहन या संगीतकारांसोबत काम करताना त्यांनी सांगितलेल्या चालीव्यतिरिक्त आम्हाला जे वाटायचं तीच चाल आम्ही गायचो आणि त्यांना सांगायचो की त्यांनी त्याच चाली सांगितल्या होत्या. आर डी बर्मन यांची गाणी गाताना अवघड वाटायचं. आर डी बर्मन हे डिफिकल्ट म्युझिशियन आहेत. 


ज्या मंगेशाने मला इथपर्यंत आणलं तोच मंगेश पुढे नेईल असं म्हणत आशा भोसले यांनी 'मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश' हे गीत गायलं.


ही बातमी वाचा :