अहमदनगर/नाशिक : मकरसंक्रांतीनिमित्त पतंग उडवताना दोघांचा बळी गेला आहे. अहमदनगरच्या राहता आणि नाशिकच्या जेलरोड परिसरातील दोघांचा पतंगबाजी करताना मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.


अहमदनगरमधील राहाता शहरात शनीमंदिर रोडवर घरावर पतंग उडवत असताना विजेचा धक्का लागून तुषार वाडीले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तुषार बारावीचा विद्यार्थी होता. तुषार त्याच्या मित्रांसोबत घरावर पतंग उडवत होता. जवळून जाणाऱ्या विजेच्या तारेवर अडकलेली पतंग काढताना तुषारला विजेच्या तारेचा शॉक लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. तुषारला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे दोन मित्रही जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


तर नाशिकमध्ये इमारतीवर पंतग उडवताना तोल गेल्याने खाली पडून सुफियान कुरेशी या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी सुफियान इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पतंग उडवत होता. मात्र तोल जाऊन तो जमिनीवर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. उपचारासाठी सुफियानला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यात त्याचा मृत्यू झाला. सुफियान जेलरोड परिसरातील मोरे मळातील रहिवासी होता.


पतंग उडवणाऱ्या लहान मुलांकडे पालकांनी लक्ष द्यावे, अशा सूचना वेळोवेळी दिल्या जातात. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि अशा घटना समोर येतात.