पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी पंढरपुरात आलेले भाविक माघारी परतू लागले आहेत. शुक्रवारी 15 लाखांहून अधिक भाविक/वारकरी पंढरपुरात होते. त्यानंतर चंद्रभागा वाळवंट, भाविकांच्या निवासाचा 65 एकराचा तळ, वाखरी पालखी तळ परिसरात जमा झालेला कचरा साफ करण्यासाठी अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 300 साधकांनी पुढाकार घेतला आहे. या साधकांनी आतापर्यंत एक टन कचरा जमा केला आहे.

आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात आलेल्या भाविकांपैकी अनेक जण परिसरात अस्वच्छता पसरवण्याचे काम करतात. या काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होतो. हा कचरा साफ करण्यासाठी नगरपरिषदेला 7 दिवस सफाई करावी लागते.

नगरपरिषदेला सफाईच्या कामात मदत करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग चे जवळपास 300 साधक आज (रविवार) सकाळीच पंढरपुरात दाखल झाले. चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, वाखरी पालखी तळ या परिसरात त्यांनी स्वच्छता केली. चंद्रभागा नदीच्या पात्रात जमा झालेला कचरादेखील त्यांनी जमा केला.

अनेकांना विठ्ठलाचे दर्शन केल्याचे समाधान मिळते. तर आम्हा साधकांना पंढरपुराची साफसफाई केल्याचे समाधान मिळते. असे एका साधकाने सांगितले.