नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकमध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महाजन बोलत होते. महाजन यांनी यावेळी निवडणुकीसाठी 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान आचासंहिता लागेल, असे भाकीतही वर्तवले आहे.

याआधी पिंपरी येथील एका कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकीत केले होते.

गिरीश महाजन म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेनूसार मी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला आहे.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी आघाडीतील नेत्यांच्या भाजपप्रवेशाबाबत भाष्य केले. महाजन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक बडे नेते भाजपमध्ये आले. आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे नेते सोडले तर त्यांच्या मागे उभं राहायला कोणीही तयार नाही.

दोन्ही पक्षांच्या पहिल्या फळीतील अनेक नेते आमच्याकडे येण्यास इच्छूक आहेत. आषाढी एकादशीला जसे वारकऱ्यांचे डोळे विठुरायाकड़े लागतात तसे आता सगळ्यांचे (कांग्रेस राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांचे) भाजपकडे लक्ष आहे, कारण भारतीय जनता पक्षाशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

महाजन यांनी नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा दिल्या. महाजन यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 50 आमदारांचा आकडा पार करुन दाखवावा, असे अव्हानही दिले आहे.