उस्मानाबाद : अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना जसा न्याय दिला तसा आम्हाली न्याय द्या, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले मृत शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुंटुबियांची आहे. दिलीप ढवळेंसह 16 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परतफेड न केल्याचामुळे दिलीप ढवळे यांनी 12 एप्रील 2019 या दिवशी पहाटे पाच वाजता आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दिलीप यांनी सेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.
दिलीप यांच्या हस्तक्षराची पडताळणी केल्यावर 15 संप्टेबर 2019 या दिवशी ओमराजेंसह त्यांच्या आईवरही गुन्हा दाखल झाला. आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवी 306, 420, 406, 120 अशी कलमे लावून ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप पोलिसांनी प्रकरणात चार्जशिट दाखल केलेले नाही. दरम्यान लोसकभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ढवळे कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले होते. दिलीप ढवळे यांच्या मुलाला बारामतीत लिपीकाची नोकरी देण्यात आली आहे. उस्मानाबादला आल्यावर उध्दव ठाकरे यांनीही जाहिर सभेत ढवळे कुटुंबाला न्याय देवू अशी ग्वाही दिली होती.
पण सत्तांतर झाल्यापासून राजकीय दबावामुळे हे प्रकरण दडपून टाकल्याचा दिलीप ढवळे यांचे भाऊ, मुलगा आणि विधवा पत्नीचा आरोप आहे. ढवळे कुटुंबिय उद्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला जाणार आहे. विरोधी पक्षनेत्यांचीही भेट घेणार आहेत. खासदार ओमराजेंसह आरोपींना अटक करून रखडलेला पोलिस तपास पुर्ण करावा अशी ढवळे यांची मागणी आहे...
घटना कशी घडली
उस्मानाबाद मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याने दिलीप ढवळेंना मानहाही सहन करावी लागली. चार एकर जमीनिचे ओमराजे निंबाळकर आणि विजय दंडनाईक या दोघांनी फसवणुकीतून केलेले गहाणखत यामुळे कुटुंबाचे हाल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहून कसबे तडवळे गावातल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दिलीप ढवळे 59 वर्षांचे होते. शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत त्यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये ढवळे यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाचाही उल्लेख केला आहे.
दिलीप ढवळे यांचा मृतदेह झाडावरून खाली उतरवण्यात आल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात ढोकी पोलीस निरीक्षकाच्या नावे लिहिलेली चिठ्ठी आणि मतदारांना आवाहन करणारे पत्र सापडले आहे. ढवळे यांनी सुसाईड नोटमध्ये ओमराजे निंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या दोघांनी जी फसवणूक केली त्याचमुळे आत्महत्येची वेळ आल्याचे ढवळे यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.
या दोघांनी चार एकर जमिनीवर बोजा चढविण्यास भाग पाडले. आपल्या नावे घेतलेल्या कर्जाची सर्व रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली. हमी देवूनही परतफेड न केल्यामुळे जमिनीचा तीनवेळा लिलाव पुकारला गेला. त्यातून गावात मानहानी झाली आहे. सततचा दुष्काळ आणि यांनी केलेली फसवणूक यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.
दिलीप ढवळे यांच्यासारखेच फसवणुकीला बळी पडलेले श्रीमंत तांबोरे हे शेतकरीही मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. मात्र, भेट होऊ शकली नाही, उद्धव ठाकरेंची भेट झाली असती तर काहीतरी मार्ग निघाला असता आणि ढवळेंनी जे पाऊल उचललं ते त्यांनी उचललं नसतं अशी खंत तांबोरे यांनी व्यक्त केली होती. एवढंच नाही तर उद्या आमच्यावरही अशीच वेळ येणार आहे जमीन विकून कर्ज फेडण्याची वेळ येणार आहे. अन्यथा आमच्यासमोरही आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही असे तांबोरे यांनी म्हटले आहे.
मी नाही तर ह्या प्रकरणात बँक दोषी : ओमराजे
मी नाही तर ह्या प्रकरणात बँक दोषी आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यावर मला अटकपूर्व जामिन मिळाला आहे. मी कारखान्याचा संचालक वा चेअरमन नाही. माझा तपास अधिकाऱ्यांवर दबाव नाही. हा तपास लवकर पूर्ण करावा, अशी माझी पण मागणी आहे, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे.