पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 विक्रमी शांततेत निघालेल्या मोर्चानंतर आता शनिवारी (7 नोव्हेंबर) पंढरपूर ते मंत्रालय अशा निघणाऱ्या पायी आक्रोश मोर्चाला रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. आज रात्री पासून दोन दिवस एसटी बस सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.


मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गासह शहरातील मोर्चेकरांच्या मार्गावर प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. उद्या रात्री बारा वाजल्यापासून महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल मंदिर प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून पंढरपूर शहरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त जणांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे.


पंढरपूर येथून नामदेव पायरीचे दर्शन घेऊन दुपारी बारा वाजता निघणारा हा आक्रोश मोर्चा अकलूज , बारामती , आकुर्डी , निगडी , मावळ वाशी मार्गे मंत्रालयावर पोहोचणार आहे. या संपूर्ण मार्गात गावोगावी समाजाचे प्रबोधन करीत वारकरी दिंडी प्रमाणे हा प्रवास केला जाणार असल्याचे आयोजक धनाजी साखळकर आणि महेश डोंगरे, आशु ढवळे यांनी सांगितले. दरम्यान या मोर्चाला मोर्चेकऱ्यांनी येऊ नये यासाठी पंढरपूरला येणाऱ्या सर्व एसटी बसेस दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होईल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने आता मराठा समाज व प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.


#Maratha 'अशोक चव्हाणांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हटवा', शिवसंग्रामच्या विनायक मेटेंची मागणी