मुंबई : आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरे करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.


राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते मंत्रीमंडळ बैठकीत मागणी करणार आहेत.


दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. तसेच कोरोनात श्वसनाला त्रास होतो त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. आज टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची बैठक घेतली.


500 लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर


राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे 500 लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.


राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार


थंडीमध्ये इन्फ्लुएन्झा सारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्वेलन्स वाढविणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.


डॉक्टर्स, नर्स यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम


लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेम्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.