नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या यूपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना राज्यात परत आणण्यासाठी प्रवासव्यवस्था करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. दिल्ली, कोटा येथे विविध परीक्षांचे विद्यार्थी अडकून पडले असल्याच्या बातम्या झळकत होत्या. यासंदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी तात्काळ ट्वीट करून मदतीसाठी विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. तसेच दिल्लीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी सत्यजीत तांबे यांच्याशी संपर्क करुन राज्यात स्वगृही परतण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र सरकारने देखील यासाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला होता.


खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू



 विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता सत्यजीत तांबे यांनी देखील या प्रकारणात पुढाकार घेऊन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्वीट करून प्रवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. सोबतच त्यांनी महाराष्ट्र शासनाचे पत्रदेखील जोडले आहे. विद्यार्थी स्वत:चा खर्च करण्यास तयार असल्याचे देखील सांगितले आहे.

दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत : सत्यजीत तांबे


आमचा दिल्ली सरकारसोबत यासंबंधी वार्तालाप सुरू असल्याचे तांबे यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी राजस्थानमध्ये कोटा येथे कोचिंग क्लासचे विद्यार्थी सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना राजस्थान सरकारने प्रतिसाद दिला होता आणि कोटा येथील विद्यार्थी राज्यात स्वगृही परतण्यास निघाले आहेत.


खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दिल्लीत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या विद्यार्थ्यांसाठी तातडीनं दिल्लीतून मुंबई किंवा पुण्याकडे रेल्वे पाठवावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली होती.


मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी आपण स्वत: संपर्कात आहोत. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेननं किंवा बसने आणण्याचा निर्णय शासनस्तरावर लवकरच होईल, असा विश्वासही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला होता. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरात जवळपास दोन ते अडीच हजार मराठी विद्यार्थी अडकून पडले आहेत. 31 मे रोजी नियोजित असलेल्या पूर्वपरीक्षेबाबत केंद्र सरकार पुढच्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे एकीकडे परीक्षेचं भवितव्य अधांतरी आणि दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकून पडल्यानं खाण्यापिण्याचे हाल अशा कात्रीत हे विद्यार्थी सापडले आहेत.


Coronavirus | राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 361 वर