नवी दिल्ली : दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांचे कसे हाल होतायत याला एबीपी माझानं वाचा फोडली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज या विद्यार्थ्याशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांसाठी तातडीनं दिल्लीतून मुंबई किंवा पुण्याकडे रेल्वे पाठवावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे.


मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी आपण स्वत: संपर्कात आहोत. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेननं किंवा बसने आणण्याचा निर्णय शासनस्तरावर लवकरच होईल, असा विश्वासही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरात जवळपास दोन ते अडीच हजार मराठी विद्यार्थी अडकून पडले आहेत. 31 मे रोजी नियोजित असलेल्या पूर्वपरीक्षेबाबत केंद्र सरकार पुढच्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे एकीकडे परीक्षेचं भवितव्य अधांतरी आणि दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये परराज्यात अडकून पडल्यानं खाण्यापिण्याचे हाल अशा कात्रीत हे विद्यार्थी सापडले आहेत.


लॉकडाऊनमुळे राजस्थान मधील कोटात अडकलेले महाराष्ट्राचे विद्यार्थी मायभूमीत दाखल


मिशन कोटानंतर आता मिशन दिल्ली
नुकतंच महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नानंतर राजस्थानमधल्या कोटामध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीनं बसद्वारे आणण्यात आलं होतं. त्यामुळे आता यूपीएससी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही सरकार काय पावलं उचलतं हे पाहावं लागेल. शिवसेनेच्या वतीनं दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरात मराठी-अमराठी सर्वच विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तातडीनं विद्यार्थ्यांची अडचण जाणून घेतली. दुसऱ्याच दिवशी इथे तात्काळ मोफत भोजनाचीही व्यवस्था सुरु झाली.


कोटातील विद्यार्थी परतले


राजस्थान राज्यातील कोटा या ठिकाणी महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांना धुळे आगारामतून एसटी बस पाठवून राज्यात आणण्या आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना काही सूचना देऊन होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.


Maharashtra Lockdown | राजस्थानच्या कोटात अडकलेले 97 विद्यार्थी पुण्यात परतले