सांगली : राज्यात भोंग्यांवरुन राजकारण तापलं असताना सांगली जिल्ह्यातील 495 मशिदींपैकी 358 मशिदींनी ध्वनिक्षेपक परवान्यासाठी सांगली पोलीस दलाकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी 64 मशिदींना विहित आवाजात ध्वनीक्षेपक लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर 63 मंदिरांनी भोंग्यांबाबत अर्ज केले असून 26 मंदिरांना परवानगी दिली आहे. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर 4 मे पासून मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात भोंग्यावरुन वातावरण तापलं. काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर भोंगे लावले तर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कार्यकर्त्यांना भोंगे लावण्याआधीच ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे बऱ्याच ठिकाणी भोंग्यांशिवाय मशिदीमधील अजान पार पडली. 


भोंग्यांबाबत धोरण ठरवण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांनी विविध शहरं आणि जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक बोलावली होती. मशिदी आणि मंदिर यांना आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं लागेल, असंही काही पोलीस आयुक्तांनी ठणकावलं होतं. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनिक्षेपक लावण्यासाठी परवाना घेण्याचं आवाहन केलं होतं. 


सांगली जिल्ह्यात एकूण 508 मशिदी असून त्यापैकी 495 मशिदीवर ध्वनिक्षेपकाचा वापर सुरु होता तर 13 मशिदींवर ध्वनिक्षेपक लावलेले नव्हते. पोलिसांच्या आवाहनानुसार 358 मशिदींनी परवान्यासाठी अर्ज केले असून पोलिसांनी आतापर्यंत 64 मशिदींना परवानगी दिली आहे. तसंच जिल्ह्यात 2596 मंदिरं असून त्यापैकी 263 मंदिरांवरच ध्वनीक्षेपकाचा वापर होत होता. या 263 पैकी 63 मंदिरांनी परवान्यासाठी अर्ज केले असून 26 मंदिरांना आज अखेर परवाने दिले आहेत. इतर अर्जांची छाननी सुरु असून त्यांनाही लवकरच परवाने दिले जाणार आहेत. उर्वरीत धार्मिक स्थळांनी ध्वनीक्षेपक परवान्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहन यापूर्वीच पोलीस प्रशासनाने केलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या