Sujay Vikhe-Patil on Rohit Pawar : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केलीय. कर्जत-जामखेड तालुक्यातील एक तरी सरकारी अधिकारी हसताना दिसतो का? त्यांच्या चेहऱ्यावर कायमच गांभीर्य असते. तालुक्यात एक नाही तर दहा आमदार आहेत, कारण आमदारांना पीए च तेवढे आहेत असा टोला खासदार सुजय विखेंनी आमदार रोहित पवारांना लगावलाय. कर्जत तालुक्यातील शिरपूर येथे सभामांडपाचे उद्घाटन सुजय विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विखे बोलत होते. 


विकासकामांच्या श्रेयवादावरुन विखे आणि पवारांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच तालुक्यात कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर आमदारांकडून दबावतंत्र सुरु असल्याचा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कर्जतमधील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कामाची मंजुरी माजी मंत्री राम शिंदे यांनी दिली. निधीही त्यांनीच आणला. पण नारळ फोडण्यासाठी भलतेच लोक गोळा झाले असेही विखे पाटील म्हणाले. आमदार राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करुन त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. मिरजगावमधील रस्त्याची दुरवस्था पाहावी. राष्ट्रीय महामार्गाचे काम आमच्यावर सोडा, तुम्ही आणलेल्या निधीतील रस्ता तरी पूर्ण करा, टोलाही त्यांनी लगावला.


कर्जत जामखेडमध्ये दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोपगी विखे पाटील यांनी केला. कोणत्याही कार्यकर्त्याला कोणाचे नेतृत्व स्वीकारावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये दबाव तंत्राने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडवला जाणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. आमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य संघर्षात गेले. मात्र आम्ही कधी सुडबुद्धीने कोणावर कारवाई केली नाही. एखाद्या पक्षातील कार्यकर्त्यांना दबाव तंत्र वापरून स्वतःचा पक्ष वाढवत असाल तर याला कर्जत-जामखेडच्या जनतेला उत्तर द्यावेच लागेल असेही विखे पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान, विखे आणि पवार घराण्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरुन कलगीतुरा रंगताना दिसत असतो. आता पुन्हा सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यामुले आता त्यांच्या टिकेला रोहित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: