नाशिक : राज्यात भोंग्यांवरुन वातावरण तापलं आहे. केवळ मशिदींनाच नाही तर मंदिरांनाही आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे त्रंबकेश्वर मंदिर, साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असणारे सप्तश्रुंगी देवस्थान ट्रस्टलाही आवाजाचे निर्बंध असतील. शिर्डी साई मंदिराप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या मंदिरात पहाटे सहाच्या आधी काकड आरती होते त्यांना सर्वांना निर्बंध लागू होणार आहेत. एबीपी माझाशी संवाद साधताना नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही माहिती दिली. 

Continues below advertisement


शिर्डी देवस्थान ट्रस्टकडून स्थानिक पोलिसांकडे भोंगे लावण्याच्या परवानगीसाठी अर्ज आला आहे. भोंगे लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या अटी-शर्तीवर परवानगी दिली जात आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या सूचनेनंतर ग्रामीण भागातील धार्मिक स्थळ, मंदिराकडून अर्ज घेतले जात आहेत. आतापर्यंत सुमारे साडेपाचशे अर्ज आले आहेत. त्यापैकी 380 हून अधिकांना भोंगे लावण्यास ग्रामीण पोलिसांनी परवानगी दिली आहे, 


परवानगीनुसार सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच भोंगे वाजणार आहेत. दोन धार्मिक स्थळ जवळजवळ असतील तर पूर्वापार एका समाजाची पुकार, अजान  सुरु असेल तर त्याच्या 15 मिनिटे आधी, सुरु असताना आणि संपल्यानंतर 15 मिनिटे दुसऱ्या धार्मिक स्थळ मंदिराला लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नाही. डेसिबलसह इतर नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचं सचिन पाटील यांनी सांगितलं.


ग्रामीण पोलिसात नोंद असणारी धार्मिक स्थळं
मंदिर - 3760
जैन मंदिर - 43
मशिद - 551
दर्गा -266
मदरसा - 71
कब्रस्तान - 102
चर्च - 45
गुरुद्वारा - 9


धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस लवकरच धोरण ठरवणार
दरम्यान धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत पोलीस लवकरच धोरण ठरवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांसंदर्भात निर्णय दिला असला तरी सध्या राज्याचं भोंग्यांच्या परवानगीसंदर्भातील कोणतंही धोरण ठरलेलं नाही. हेच धोरण ठरवण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भोंग्यांच्या परवानगीबाबत धोरणावर चर्चा होणार असल्याचं समजतं.


इतर महत्त्वाच्या बातम्या