Vidrohi Marathi Sahitya Sammelan : 23 आणि 24 एप्रिल रोजी उदगीर येथे 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं (Vidrohi Marathi Sahitya Sammelan) आयोजन करण्यात आलं आहे. हे साहित्य संमेलन प्रख्यात कवी गणेश विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाची कार्यक्रमपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि पत्रकार रविश कुमार या साहित्य संमेलनास हजेरी लावणार आहेत. 


22 तारखेला संमेलनाच्या पूर्वसंध्येला 'शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला' या गाजलेल्या प्रबोधनपर नाटकानं संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. तर 23 तारखेला सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून विद्रोही साहित्य संस्कृती विचारयात्रेला लिंगयात चळवळीचे नेते चंद्रकांत वैजापूरे यांच्या हस्ते सुरुवात होईल. ही यात्रा महात्मा बसवण्णा वचनसाहित्य नगरीत साडेदहा वाजता पोहचेल. अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाहचे प्रमुख सुफी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुफी विचारवंत सरवर चिश्ती यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीचे विद्रोही विचारवंत डॉ. अशोककुमार पांडेय, विद्रोही संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. आनंद पाटील, 14 व्या विद्रोही मराठी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि चौथ्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक डॉ. अजीज नदाफ हे उपस्थित राहणार आहेत.


विद्रोही साहित्य संमेलनाची चतुसूत्री


सांस्कृतिक बहुविधतेचा सन्मान, बहुभाषिकांचा आदर, संविधानाचे समर्थन आणि सनातनवादाला विरोध या चतुःसुत्रीवर हे सोळावं विद्रोही साहित्य संमेलन उभे राहणार आहे. यादृष्टीने कोकणी-मराठी वादाऐवजी दोन्हींसह दखनी, उर्दू, कन्नड इत्यादी भाषिक लेखक, रसिकांना विद्रोहीनं सन्मानानं आमंत्रित केलं आहे. म. फुले रचित सत्याचा अभंग, कबीराचा दोहा आणि आंबेडकरी शाहीर वामनदादांचे मानवगीत आणि आदिवासी लोककलावंत अमृत भिल्ल यांच्या पावरी वादनानं विद्रोही मराठीचा सोहळा सुरु होणार आहे.


उद्घाटन सभारंभातील मुख्य घटक


उद्घाटन समारंभाचा अविभाज्य भाग असणारे तीन घटक आहेत. त्यात चार जणांना यावर्षीचे विद्रोही जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. त्यात प्रसिध्द पुरोगामी शेतकरी नेते रंगा राचुरे, तत्वज्ञ संपादक डॉ. नागोराव कुंभार, सामाजिक कार्यकर्ते रामराव गवळी आणि अंधश्रध्दा निर्मूलनाचे सत्यशोधक माधव बावगे यांचा समावेश आहे. 


शिल्पप्रदर्शन, चित्रप्रदर्शन, संविधान संस्कृती पोस्टर प्रदर्शन, खानदेशातील आंबेडकरी योध्दे हे छायाचित्र प्रदर्शन आणि अहमद सरवर यांचे उदगीर इतिहासावरील छायाचित्र प्रदर्शन हे वैशिष्ट्य असणार आहे. या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. नवीन पुस्तक, ग्रंथाच्या कार्यक्रमाने एकूण उद्घाटन सत्राची सांगता होईल.


विविध विषयांवर परिसंवाद आणि मुलाखत


16व्या विद्रोही संमेलनात वैचारिक मेजवानी आहे. साहित्य संस्कृती माध्यमे यावरील चार परिसंवाद होतील. विविध सामाजिक राजकीय विषयांवरील सोळा गट चर्चा आणि एका वादग्रस्त लेखकाची विशेष मुलाखत अशी वैचारिक देवाणघेवाणीची सुवर्णसंधी विद्रोहीनं प्राप्त करुन दिली आहे.


नाट्यप्रयोग, कवी आणि झुंड चित्रपटातील रॅपटोळीची हजेरी


वैचारिक मंथन बरोबरच काही नाट्य प्रयोगही आयोजित करण्यात आले आहेत. या नाट्य प्रयोगातून समाजातील असमतोलावर आसूड ओढण्यात आले आहे. "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" हे देशभरात गाजलेले नाटक 22 तारखेला सादर करण्यात येणार आहे. तसेच तीन एकपात्री प्रयोग, झुंड चित्रपटात रॅप सादर केलेल्या 'रॅपटोळी' या आर्केस्ट्रा सादर करणाऱ्या तरुणांचे सादरीकरण, दोन नाटकं, एक भारुड या सांस्कृती कार्यक्रमाची रेलचेल विद्रोहीत आहे. दोन्ही कवी संमेलनात महाराष्ट्रातील 90 नामवंत कवी सहभागी होणार आहेत. बहुभाषिक कवी आपल्या रचना सादर करतील.


"महात्मा बसवण्णा वचनसाहित्यनगरी"


उदगीर शहराला महात्मा बसवण्णांच्या लिंगायत चळवळीची पार्श्वभूमी आहे. विद्रोहीने विस्तीर्ण जिल्हा परिषद मैदानावर उभ्या राहत असलेल्या संमेलननगरीला "महात्मा बसवण्णा वचनसाहित्यनगरी "हे नाव दिले आहे. या नगरीत फुले शाहू आंबेडकर विचारमंचावरुन होणाऱ्या मंथनातील दुसरे सत्र 'सनातनवाद आणि महात्मा बसवण्णांच्या वचनसाहित्यातील विद्रोह' हे आहे. उस्तुरी मठाचे अधिपती आणि प्रख्यात प्रबोधक कोर्णेश्वर अप्पाजी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात अनेक मान्यवर अभ्यासक विचार मांडतील. झुंड चित्रपटात गाजलेल्या विनीत तातड व सहकाऱ्यांची समाजप्रबोधनपर रॅपगीते सादर करतील.


रसिक प्रेक्षकांना गटचर्चेत येण्यासाठी आवहान


केवळ मोठ्या विचारवंतांची भाषणे ऐकण्यासाठी नाही तर आपले म्हणणे मांडण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे . सामान्य वाचक, रसिकांना आपले म्हणणे मांडता यावे व व्यापक वैचारिक संवाद व्हावा यासाठी शिक्षण, राजकीय भोंगा, अंधश्रध्दा, नागरीकत्व, एनआरसी, शेती, भटके विमुक्त प्रश्न अशा सोळा सामाजिक व राजकीय विषयांवर गटचर्चा होणार आहेत.


समारोप सोहळ्यात नागराज आणि रविश कुमार


या सर्वांवर कळस रचणारा समारोपाचा कार्यक्रम असणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशींच्या अध्यक्षतेत कवी विख्यात सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते समारोप होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathi Sahitya Sammelan : उदगीरच्या साहित्य संमेलनात असणार विविध कार्यक्रमांची रेलचेल, तयारी अंतिम टप्प्यात