Loudspeaker Controversy : राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना त्याची चर्चा आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भोंग्याच्या राजकारणात महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? गृहविभाग त्यावर ठोस पावले उचलणार का? यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाची बैठक, आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता 


भोंग्याच्या विषयावर मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महासंचालक यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये ज्या काही सूचना करण्यात आल्या त्या गृहविभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 


...त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल


काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले होते की, "धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आयबी आणि रॉ यांच्याशीही बातचीत करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना परिणामही तपासले पाहिजेत," "परंतु हा निर्णय कधी होणार, 3 तारखेच्या आधी होणार की 3 तारखेच्या नंतर होणार ते मी आज सांगू शकत नाही," असंही वळसे पाटील म्हणाले. 


राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर सरकारची धावाधाव
मशिदीवरील भोंग्यावरुन सुरु असलेलं राजकारण दिवसेंदिवस तापत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दिल्यानंतर आता राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळत आहे. भोंग्यांबाबत नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे हे पाऊल उचलावं लागलं का या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील यांनी नकारार्थी उत्तर दिलं. 


राज ठाकरे यांचा अल्टिमेटम
ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर सरकारला अल्टिमेटम दिला होता. "राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरुन आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. तसंच 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथे नमाज वाजेल तिथे हनुमान चालीसा लावणार."