Karnataka CM Basavaraj Bommai : सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai ) यांनी केली आहे. या कर्नाटक भवनसाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणा देखील बोम्मई यांनी केली आहे. गोवा, केरळसह सोलापुरात देखील कर्नाटक भवन उभारणार असल्याची माहिती बोम्मई यांनी नुकतीच दिलीय.


बोम्मई यांनी कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा उफाळला आहे. त्यातच हा वाद सुरू असल्यामुळे परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा काल बोम्मई यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.   


बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील एका गावात विकासकामांच्या उद्घाटनासाठी  बसवराज बोम्मई आले होते. यावेळी बोलताना बोम्मई यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची घोषणा करून पुन्हा एकदा महाराष्ट्रला डिवचण्याचे प्रयत्न केलेत. सीमेपलीकडील जनता देखील आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांचा विकास होत नसल्याने, तेथील शाळांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कोणत्याही राज्यातील कन्नड शाळांना अनुदान देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. कन्नड रक्षण प्रधिकरणाच्या माध्यमातून सीमेपलीकडील कन्नड शाळांना अनुदान देण्यात येईल. त्यासाठी शंभर कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात येईल. तसेच सोलापूरमध्ये कर्नाटक भवन बांधण्यासाठी दहा कोटी रूपये मंजूर केल्याची माहिती देखील बसवराज बोम्मई यांनी यावेळी दिली. सोलापूर प्रमाणेच गोवा आणि केरळमधील कासारगोड येथे देखील कर्नाटक भवनसाठी पैसे मंजूर केल्याचं बोम्मई यांनी म्हटलं आहे. 


 महाराष्ट्र, तेलंगना, तामिळनाडू, गोवा या राज्यांच्या सीमेवर असलेल्या 1800 ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी प्लॅनिंग सुरु असल्याची माहिती देखील बोम्मई यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, सोलापुरात कर्नाटक भवन उभारण्याची बोम्मई यांनी घोषणा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर दिले आहे. सोलापुरात कर्नाटक भवन बांदणार असला तर मग बेळगाव आणि बंगळुरुमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे सीमा भागावरून वाद सुरू असतनाच आता बोम्मई यांनी कर्नाटक भवनवरून पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याची घोषणा केलीय.  


आठ महिन्यापूर्वीपासूनच सुरू होते प्लॅनिंग 


बसवराज बोम्मई यांनी यांनी काल बेळगावमध्ये  बोलताना सोलापुरात कन्नड भवन बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली. बोम्मई यांनी ही माहिती काल दिली असली तरी याची घोषणा जवळपास सात ते आठ महिन्यापूर्वी झाली असल्याची माहिती कन्नड रक्षक वेदिके संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मल्लिनाथ करपे, कन्नड साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी दिली.


"सोलापुरात असलेल्या कन्नड भाषिक लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी गुलबर्गाचे आमदार दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या अधिवेशनात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपयांची घोषणा केली होती. एक कोटी रुपयांची तरतूद देखील त्याच बजेटमध्ये करण्यात आली होती, अशी माहिती मल्लिनाथ करपे यांनी दिली.  


"सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भवन हे अक्कलकोट तालुक्यात होणार असून जागेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देखील पाठवले होते. मात्र, जिल्हा अधिकाऱ्यांकडून त्या पत्राला प्रतिउत्तर मिळाले नाही. त्यामुळे जागेसाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कन्नड साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी दिली. 


 महत्वाच्या बातम्या


कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बोंबाबोंब कधी थांबणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मौन कधी संपणार?