Maharashtra Politics Shivsena:  गुजरातच्या निवडणूक प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) 100 तोंडी रावण म्हटल्यानंतर भाजपने गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे म्हटले. मात्र, जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली. भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 


महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचावासाठी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाने समाचार घेतला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान असल्याचे शिवसेनेने म्हटले. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील सहन करू शकतील. सध्या ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाचे हे धोरण असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करत असल्याचे दुःख असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले. 


मोदींवरील टीकेवर आक्रमक, मग शिवरायांबाबत थंड का?


काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी गुजरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांना रावण असे संबोधले होते. त्यानंतर भाजपने काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेने म्हटले की, मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे? असा सवाल शिवसेनेने केला. 


पंतप्रधान मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आहे. मोदींना रावण म्हटल्याने गुजरातच्या लोकभावना भडकू लागल्या, पण छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा म्हणे विरोधकांचा डाव आहे, असे भाजप सांगत आहे. यावरून भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होत असल्याचे शिवसेनेने म्हटले.