आता मौनव्रत...! अण्णा हजारे पुन्हा आंदोलन करणार
एबीपी माझा वेब टीम | 07 Feb 2019 07:52 PM (IST)
सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अण्णांनी दिला आहे. यावेळी अण्णांनी 2013 च्या आंदोलनात कार्यरत असलेल्या तत्कालीन 'टीम अण्णा'वर देखील टीका केली.
राळेगणसिद्धी (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी सात दिवस उपोषण केलं. सरकारकडून उपोषण सोडताना लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्याचं केल्याचं जाहीरपणे सांगण्यात आलं. मात्र, अण्णा आता लिखित पत्रावर अडून बसले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या परंतु केंद्रीय कृषि कार्यालयाकडून अजूनही अधिकृत पत्रच मिळालेलं नाही, असं सांगत अण्णांनी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असून दोन दिवसानंतर मौन आंदोलन करणार असल्याचे अण्णांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर सरकारने आश्वासन पूर्ण केले नाही तर निवडणूक आचारसंहितेच्या काळात पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अण्णांनी दिला आहे. यावेळी अण्णांनी 2013 च्या आंदोलनात कार्यरत असलेल्या तत्कालीन 'टीम अण्णा'वर देखील टीका केली. 2013 मध्ये दिल्ली येथे झालेल्या अण्णांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल, किरण बेदी सहभागी होते. मात्र अण्णांच्या आंदोलनानंतर टीम अण्णामध्ये असलेल्या काही लोकांच्या मनात 'मुख्यमंत्री' तर काहींच्या डोक्यात 'राज्यपाल' शिरला, असे म्हणत अण्णांनी टोल लगावला.