पुणतांबा (अहमदनगर): किसान क्रांती समन्वय समितीच्या 'देता की जाता' आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील तीन कृषिकन्यांनी गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.  चार दिवसांपासून अन्नत्याग केल्याने आंदोलक मुलींचे वजन घटले असून शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राहाता तहसीलदारांना अहवाल दिल्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांनी शुभांगीला नगर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात जाण्यास शुभांगीने नकार दिला आहे.

दीड वर्षांपूर्वी सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा पुणतांबा गावातून युवतींनी एकत्र येत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या चार दिवसापासून पुणतांबा गावात शुभांगी जाधव, निकिता जाधव व पूनम जाधव या शेतकरी कन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. याकडे सरकारचं मात्र अद्यापही दुर्लक्ष आहे.

सात बारा कोरा करा,  शेतमालाला योग्य भाव द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हो आंदोलन सुरू केलं आहे. अन्नत्याग केल्याने तिन्ही मुलींचं वजन घटलं आहे. यापैकी शुभांगी जाधव हिची प्रकृती जास्त खालावली आहे. वैद्यकीय पथकाने आंदोलनकर्त्यांची तपासणी केल्यानंतर राहाता तहसीलदारांना अहवाल पाठविला आहे. त्यानंतर तहसीलदार माणिक आहेर यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शुभांगीला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र त्यास शुभांगीने नकार दिला. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या मुलींनी केला आहे.

दरम्यान या आंदोलनासाठी विविध संघटनांनी मुलींची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे. मात्र या आंदोलनाकडे  लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आज भीक मांगो आंदोलन करत ग्रामस्थांनी भीक मागून मिळणारा निधी मुख्यमंत्र्यांना मनिऑर्डरने पाठवला आहे.



काल नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा देत गाव कडकडीत बंद ठेवलं होतं. पुणतांबा गावातील शाळकरी मुलींनी आंदोलनात सहभाग घेत आंदोलन करणाऱ्या मुलींच्या समर्थनार्थ गावातून काळे झेंडे घेऊन फेरी काढली होती. सरकार विरोधात घोषणाबाजी करत शालेय विद्यार्थिनींनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.