औरंगाबाद : जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी गावच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुख्याध्यापकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गटविकासक अधिकाऱ्यांच्या तपासात अनेक विद्यार्थिनींनी मुख्याध्यापक आपल्याशी असभ्य वर्तन करत असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

जरंडी गावच्या जिल्हा परिषद शाळेत गटविकास अधिकाऱ्याने नियमित तपास केला. या तपासादरम्यान विद्यार्थिंनीनी शाळेचे मुख्याध्यापक लैंगिक छळ करत असल्याचे सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक हरिदास काटोले विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत बोलतात, डोक्यावरुन, पाठीवरुन हात फिरवतात, ओढणी सरळ करण्याच्या बहाण्याने घाणेरडी कृत्यं करतात. अशा अनेक तक्रारी विध्यार्थिनींनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

या तक्रारींनंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफीसर (गटविकास अधिकारी)महारु राठोड यांनी मुख्याध्यापक हरिदास काटोले याला निलंबित केले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अहवाल सादर केल्यानंतर हरिदास काटोले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.