रत्नागिरी : रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी उदय सामंत यांनी भाजपला लक्ष्य केले होते. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप आत्मनिर्भर अभियानातून करत असल्याची टीका अनिल परब यांनी केली होती. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. अनिल परब यांना कोकणात यायला वेळ नाही. त्यांचा वेळ हा मातोश्रीवरच्या गेटवर आणि भांडी धुण्यात जात असल्याचे टीकास्त्र निलेश राणे यांनी केली आहे.


निसर्ग चक्रीवादळावरून कोकणात थेट शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रंगताना दिसत आहे. चक्रीवादळानंतर कोकणच्या जनतेची फसवणूक झाली. त्यांना अपेक्षित अशी मदत सत्ताधाऱ्यांनी केली नसल्याची टीका कोकण दौऱ्यावर आलेल्या भाजप नेत्यांनी केली होती. त्याबाबत शिवाय, दापोली आणि मंडणगड या भागात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत सरकारने किती मदत दिली अशी विचारणा काल अर्था रविवारी ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. त्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सार्व माहिती दिली होती. यावेळी अनिल परब यांनी भाजपला लक्ष्य केले होते. त्यानंतर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत अनिल परब आणि उदय सामंत यांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, आम्ही प्रश्न विचारल्या तुम्ही टीका करता. त्यापेक्षा नुकसानग्रस्त गावांची पाहणी करा. आमच्यावर टीका करायला लाजा नाही का वाटत? अशी टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे.


'...तर लोकं चपलेने मारतील'


अनिल परब मुळात आहेत कुठे? मागच्या दोन - तीन महिन्यामध्ये ते कितीवेळा रत्नागिरीमध्ये आले. त्यांनी रत्नागिरीसाठी काय केले? तिवरेवासियांसाठी काय केले? आतापर्यंत तुम्ही केलेला ड्रामा लोकांना पचला. पण, आता पचत नाही आहे. आता तुमचे सर्व उघड होत आहे. सत्ता असून पण तुम्ही असे वागणार असाल तर लोकं चपलेने मारतील अशा शब्दात यावेळी निलेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. शिवाय, उदय सामंत हा ड्युब्लिकेट माणूस असल्याची टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे आता निसर्ग चक्रीवादळानंतर कोकणात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून आगामी काळात राजकारण तापण्याची देखील दाट शक्यता आहे.


निसर्गमुळे कोकणचे अपरिमित नुकसान


निसर्ग चक्रीवादळ कोकणला धडकल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे आणि बागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. महिनाभरानंतर आजही काही गावांमध्ये विज पुरवठा सुरळीत झालेला नाही. शिवाय, काही ठिकाणी पंचनामे करताना घोळ झाल्याचे देखील समोर आले आहे. दरम्यान, कोकणवासियांना सावरण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. सरकार कोकणवासियांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन रत्नागिरी जिल्ह्याचे पाकमंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा दिले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


कोरोनामुळे प्रक्रिया उद्योगांवर संकट! करोडो रूपयांची उलाढाल ठप्प, तर हजारो हात बेरोजगार


कापूस, सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या राज्यात 30 हजार तक्रारी