रत्नागिरी : कोकण म्हटलं की, डोळ्यांसमोर उभा राहतो तो निसर्गाचा विलोभनीय नजारा. आंबा, काजु, जांभुळ, करवंद म्हणजे कोकणची ओळख. या रानमेव्याला जगात मोठ्या प्रमाणावर मागणी. शिवाय, या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील सध्या कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये आहेत. पण, आता कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आल्याच्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोकणातील प्रक्रिया उद्योग संकटात सापडले आहेत.
मार्च ते मे महिना या तीन महिन्याच्या कालावधीत ही फळं गोळा करत त्यापासून आंबापोळी, करवंद जाम, फसणपोळी, आमरस यासारखे इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. पण, यंदा मात्र साऱ्या गोष्टी जैसे थे राहिल्या आहेत. त्यामुळे करोडो रूपयांची उलाढाल देखील ठप्प झाली असून हजारो जणांचा हातचा रोजगार देखील हिरावला गेला आहे. त्यामुळे सध्या या कामगारांसमोर आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शेकडो प्रक्रिया उद्योग असून या साऱ्या उद्योगांमध्ये लाखो टन फळांवर ही प्रक्रिया होते. त्यामुळे यातून करोडो रूपयांची उलाढाल होते. पण, यंदा या साऱ्याबाबी ठप्प झाल्या आहेत. परिणामी उद्योजक असतील किंवा कामगार या साऱ्यांना वर्षभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यातून बाहेर पडायचे कसे? असा यक्ष प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.
पाहा व्हिडीओ : रत्नागिरीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; झेडपीच्या सीईओंना कोरोनाची लागण
जगाच्या बाजारात देखील मोठी मागणी
कोकणी रानमेवा असो किंवा त्यापासून तयार होणारे पदार्थ या साऱ्यांना देशासह जगाच्या बाजारपेठेत देखील मोठी मागणी असते. पण, यंदा मात्र साऱ्या गोष्टी ठप्प झाल्या आहेत. माल तयार नाही. त्यामुळे वर्षभर या वस्तु बाजारात किती प्रमाणात उपलब्ध होतील याबाबत देखील शंका आहे. अगदी काजू, आंबा, फसण, जांभुळ आणि करवंद यांची खरेदी ही रोखीने देखील अनेक उद्योजक करायचे. त्यामुळे कष्टकरी वर्ग हा या फळांची विक्री करत पावसाळ्यात आपला खर्च गोळा करायचा. त्याचा फायदा त्याला शेतीच्या कामे करताना देखील होत असे. पण, यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सारे व्यवहार आणि उलाढाल देखील ठप्प झाली आहे. परिणामी आता हातावर पोट असणाऱ्या अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हे उद्योग सुरू असल्याने त्यावर अप्रत्यक्षरित्या देखील अनेक हातांना रोजगार उपलब्ध होत असे. अगदी वाहतूकीकरता चालक असो किंवा माल उतरवण्यासाठी लागणारा हमाल. पण, यंदाचे चित्र वेगळे आहे. ऐन तीन महिन्याच्या काळात हे सारे व्यवहार ठप्प झाल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना आता यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या प्रत्येकाला करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कापूस, सोयाबीनच्या बोगस बियाणांच्या राज्यात 30 हजार तक्रारी
कोरोनामुक्तीनंतर जंगी स्वागत महागात, माजी उपनगराध्यक्षांसह 100 जणांवर गुन्हे
कोरोना प्रतिबंधक काळात सत्कार भोवला; भाजप पदाधिकाऱ्यांसह 40 जणांवर गुन्हा