लातूर : महिलांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा हा उद्देश डोळ्यापुढे ठेवत स्थानिक स्वराज संस्थेत महिलांसाठी आरक्षण करण्यात आले होते. त्याला अनेक गावात हरताळ फासण्यात आला आहे. ह्याची अनेक उदाहरणे कायमच समोर आली आहेत. मात्र महिलांच्या हाती कारभार देण्याची प्रेरणा यातून घेऊन गावाचा विकास करणारे आनंदवाडीने संपूर्ण राज्यासमोर आनंदवाडी पॅटर्न निर्माण केला आहे. यावेळी ग्रामपंचायत निवडणूक फक्त बिनविरोधच काढली नाहीतर विशेष म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्या ह्या महिला आहेत.


सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. गावातील गट तट आमने सामने उभे राहिले आहेत. तर काही गावात सरपंचपदासाठी कोट्यवधींच्या बोली लागल्या आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी ग्रामस्थांनी वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक तर बिनविरोध झालीच आहे. सगळ्या सदस्या या महिला आहेत . गावकऱ्यांनी एकमुखाने कारभार महिलांच्या हाती सोपवला आहे. लातूर जिल्ह्यातील 408 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होणार आहेत. त्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचे काम आनंदवाडीने केले आहे


लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी हे गाव अतिशय छोटेखाणी आहे. गावाची लोकसंख्या ही सातशेच्या आसपास आहे. एकूण मतदार संख्या 442 आहे. गावाचे संपूर्ण अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. मात्र मागील पंधरा वर्षापासून गावाने सतत विकासाची वेगळी वाट धरली आहे. ह्याची सुरुवात झाली ती महिला सरपंचपद आरक्षित झाल्यावर... गावाने कारभार महिलेच्या हाती सोपवला आणि विकासाची वाट दिसू लागली. त्यानंतर गावाने सतत विकासात्मक निर्णय घेतले आहेत. संपूर्ण गाव हगणदारीमुक्त आहे. बंदिस्त नाल्या आहेत ,पक्के बांधीव रस्ते आहेत, उद्यान आणि व्यायामशाळा आहे. संपूर्ण गावात नळाने पाणीपुरवठा नियमित केला जातो. गावातील कोणत्याही घरात हुंडा घेतला किंवा दिला जात नाही, मोफत पिठाची गिरणी आहे. पाण्यासाठी आरो सिस्टीम बसविण्यात आली आहे. देहदानचा संकल्प करणारे गाव म्हणून ही ह्या गावाची वेगळी ओळख आहे. निर्मलग्राम पुरस्कार ही गावाला मिळाला आहे.


सतत आम्ही गावातील महिलांना गावकीचा विचार करायची सवय लावली आता त्या सक्षमपणे गावा बाबतचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे कोविडचा कोणताही प्रभाव आमच्या निर्णयावर झाला नाही. संपूर्ण गावाने एकत्र येत हा निर्णय घेतला आहे. कारण की गावात गटतट नाहीत मग निवडणूक कशी होणार नाही का? गावचx हे कुटूंब आहे आमचे असे मत ग्रामस्थ माऊली चामे यांनी व्यक्त केले आहे


गावातील महिलांनी गावातील अनेक निर्णय घेतले. गावाचा चेहरा मोहरा बदलला .. मागील अनेक वर्षापासून सक्रिय सहभाग घेणाऱ्या जेष्ठ महिला आता आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यांनी यावेळी आम्हाला पुढे केले आहे. गावातील आम्ही सात महिला ग्रामपंचायतीचा कारभार पहाणार आहोत. ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनात काम करू, गावात लग्न कोणाचे ही असो सगळे गाव नेटाने काम करते तसे गावकीचा गाडा हाकू असा आशावाद ग्रामपंचायत सदस्य गंगाबाई चामे यांनी व्यक्त केला आहे


गाव जे करू शकतो ते राव करू शकत नाही. या गावाने पद आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी सरपंचपदा साठी बोली लावणाऱ्या तथाकथिक मोठ्या लोकांचे खुजेपणा अधोरेखितच केला नाही तर ह्या माध्यमातून गावाचा विकास कसा केला जातोय हे ही स्पष्ट केले आहे. लोकशाहीत बिनविरोध ग्रामपंचायत कशी काढावी .. ह्याचा वस्तूआठ घालून देणारे हे गावाचे ... ह्या मुळेच ह्या गावाचा पॅटर्नच वेगळा आहे .. आनंदवाडी पॅटर्न


संबंधित बातम्या :



Gram Panchayat Election : वयाच्या 85 व्या वर्षी लढवताहेत ग्रामपंचायत निवडणूक, उस्मानाबादच्या आजीची चर्चा