मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराची चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक नवीन मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच नाव बदलून संभाजीनगर करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगाबाद महापालिका निवडणूक आली की नामांतर वाद होतो निवडणूक संपली की हा वाद संपतो. याआधी भाजप शिवसेना पाच वर्षे सत्ता होती तेव्हा नाव का नाही बदललं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करा ही राजकीय मागणी आहे. तसा औरंगाबाद आणि संभाजी महाराज यांचा फार संदर्भ सापडत नाही. संभाजी महाराज यांची समाधी पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्याचं नाव बदलून संभाजी नगर करा अशी आमची मागणी आहे. संभाजी महाराज यांचा अंत्यविधी आणि दफन पुण्यात झालं मग पुण्याला त्यांचं नाव दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.


औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. दरवेळी औरंगाबाद महापालिका निवडणुकांपूर्वी हा मुद्दा चर्चेला येतो. खरंतर गेल्यावेळी भाजप- शिवसेनेचं सरकार राज्यात होतं तरीही या दोन शहराचं नामांतर होऊ शकलं नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर हा सामना सुरु झाला आहे.


काय आहे नामांतराचा प्रश्न?


औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत 1988 बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली. त्यानंतर जून 1995 ला महापालिकेनं ठराव घेतला. युतीच्या तत्कालीन मंत्रिमंडळानं अधिसूचना काढली. पण प्रकरण न्यायालयात गेलं. नंतर निकाली निघालं. दरम्यानच्या काळात युतीची राज्यातून सत्ता गेली. त्यामुळे तेव्हा नामांतर बारगळलं. अनिता घोडेले शिवसेनेच्या महापौर असताना 4 जानेवारी 2011 मध्ये महापालिकेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली. मध्यंतरी दिल्लीत औरंगजेब मार्गाचे नामांतर एपीजे अब्दुल कलाम करण्यात आलं. त्यावेळी पुन्हा नामांतराचा मुद्दा निघाला.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यूपीतील काही शहरांची नावे बदलल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा झाली पण पुढे काहीही झालं नाही. खरंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार असताना नामांतर करणं शक्य होतं. पण भाजप आणि शिवसेनेच्या श्रेयवाद आणि टोलवाटोलवीच्या राजकारणामुळे औरंगाबादचं नामांतर काही झालं नाही. आता कुठल्याही क्षणी पालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नामांतरचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागतो की महापालिका निवडणुकीनंतर बासनात जातो हे पाहावं लागेल.



संबंधित बातम्या