शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. आनंद तेलतुंबडे यांना त्यांच्या वृद्ध आईला भेटण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात असलेल्या तेलतुंबडे यांना येत्या 8 आणि 9 मार्च रोजी आपल्या 93 वर्षीय आईला चंद्रपूरमध्ये जाऊन भेटण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाला हायकोर्टाने मंजूरी दिली आहे. आनंद तेलतुंबडे यांना पोलीस सुरक्षेत पुन्हा 11 मार्चला तळोजा तुरुंगात परत आणण्याचे निर्देश हायकोर्टाने जेल प्रशासनाला दिले आहेत. चंद्रपुरला जाण्या येण्याचा आपला खर्च तेलतुंबडे यांनी स्वत: करावा, तर त्यांच्या पोलीस सुरक्षेचा खर्च राज्य सरकारने करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. 


न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंदा सानप यांच्या खंडपीठाने बुधवारी हे आदेश जारी केलेत. याच खंडपीठापुढे तेलतुंबडे यांनी दाखल केलेल्या तीन याचिकांवर सुनावणी आहे. ज्यात त्यांनी आईच्या आजारपणाचे कारण देत दाखल केलेला तात्पुरता जामीन एनआयए कोर्टाला फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याचसोबत नियमित जामीन आणि त्यांच्याविरोधात लावलेल्या युएपीएपी कलमालाही एक स्वतंत्र याचिकेतून आव्हान दिले आहे.


शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी अंतरिम जामीन मिळण्यासाठी गेल्यावर्षी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जात त्यांनी 13 नोव्हेंबर 2021 रोजी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला आपला भाऊ आणि जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूचं कारण दिले होते. विशेष एनआयए न्यायाधीश डी ई कोथळीकर यांनी एनआयएच्या विरोधानंतर ही याचिका फेटाळून लावली होती. गडचिरोलीतील कोर्चीमध्ये स्पेशल फोर्ससोबत झालेल्या या चकमकीत 26 नक्षली ठार झाले होते. यामध्ये मिलिंद तेलतुंबडेचाही समावेश आहे. साल 2018 च्या एल्गार परिषद प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे फरार आरोपी म्हणून घोषित करण्यात आला होता. याच एल्गार परिषद प्रकरणात आनंद तेलतुंबडे देखील आरोपी आहेत. तेलतुंबडे यांच्यावर एनआयएने गंभीर आरोप केले असून आरोपपत्रही दाखल केलेले आहे.


नव्वदच्या दशकात मिलिंदचा आणि आमच्या कुटुंबाचा संबंध तुटला आणि तो कोणाच्याच संपर्कात नव्हता. आपल्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झाल असून आईच वयही आता नव्वदीच्या पार आहे. त्यामुळे घरातील मोठा मुलगा या नात्याने अशा प्रसंगी आपण कुटुंबासोबत असणं भावनिक दृष्ट्या आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला किमान पंधरा दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी आनंद तेलतुंबडे यांनी या जामीन अर्जात केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामे आनंद तेलतुंबडे यांना फोनवरून आईशी बोलण्याची परवानगी दिली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या