मुंबई : फक्त 'ठाकरे' आडनाव लावलं म्हणून कुणी 'ठाकरे' यांच्यासारखं होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला ट्विटरवरुन राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतच्या वक्तव्याचा निषेध केला होता. देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट अमृता फडणवीस यांनी आज रिट्वीट केलं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा उल्लेख करताना अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, एक 'ठाकरे' ज्यांनी कायम सत्य, आपली तत्वे आणि लोकांचा विचार केला. पक्ष, कार्यकर्त्यांचा विचार करताना कुटुंब आणि सत्ता याला दुय्यम स्थान त्यांनी दिलं. तर, सावरकरांच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.





अमृता फडणवीस यांच्या टीकेला शिवसेनेनंही तशासतसं चोख उत्तर दिलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले यांनी ट्वीट करत म्हटलं की, इतिहासात रघुनाथदादा पेथवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो. ठाकरे ठाकरेच, असं अमेय घोले यांनी म्हटलं. तसेच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. या बैठकीतही अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा झाली. अमृता फडणवीस यांचं ट्वीट हे बालिशपणाचं लक्षण असल्याचं बैठकीत म्हटलं गेलं.





काय म्हणाले होते राहुल गांधी?


देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.


राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरुन भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपने केली होती.


संबंधित बातम्या