मुंबई : राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. याशिवाय शिवसेनेच्या भूमिकेवरही भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेना याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेची स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची भूमिका उघड आहे. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर शिवसेनेची कोंडी झाली आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.


राहुल गांधींना सावरकरांच्या कार्याची माहिती द्यावी : संजय राऊत


राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची राज्यातील काँग्रेस नेत्यांनी माहिती द्यावी. सावरकरांबाबत राहुल गांधींना चुकीची माहिती दिली आहे. राहुल गांधीना काँग्रेस नेत्यांनी 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचायला दिलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्राचे अभिमान आहेत. आमची भूमिका कधी बदललेली नाही आणि बदलणारही नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. तर नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर आमची भूमिका आम्ही स्पष्ट केल्याचंही संजय राऊत यांनी सांगितलं.


सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही : देवेंद्र फडणवीस

देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. राहुल गांधींना त्याची कल्पना तरी आहे का? राहुल गांधी दोन दिवस तरी अशी शिक्षा ते भोगू शकतील का? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर गांधी आडनाव लावलं म्हणून कुणी 'गांधी' होत नाही. त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींनी लगावला. तर शिवसेनेची प्रतिक्रिया मवाळ असून, त्यांना त्यांची सत्ता लखलाभ, असंही फडणवीस म्हणाले.

काँग्रेस माफी मागणार नाही : राजीव सातव

राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे. जनसंघाच्या नेत्यांनी स्वतंत्रता आंदोलनात अनेकदा माफी मागितली. आम्ही महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. ज्यांनी देशासाठी प्राण दिले, अशा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहोत. त्यामुळे राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे, आम्ही माफी मागणार नाही ती योग्यच आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले होते राहुल गांधी?


देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.